‘धम्मचक्र’साठी पाऊले दीक्षाभूमीकडे

By admin | Published: October 15, 2016 12:44 AM2016-10-15T00:44:51+5:302016-10-15T00:44:51+5:30

स्थानिक दीक्षाभूमीवर ६० व्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Steps to 'Dhamchachra' | ‘धम्मचक्र’साठी पाऊले दीक्षाभूमीकडे

‘धम्मचक्र’साठी पाऊले दीक्षाभूमीकडे

Next

आज धम्मसमारंभाचे उद्घाटन : बुद्ध-भीम अस्थिकलशाचे दर्शन
चंद्रपूर : स्थानिक दीक्षाभूमीवर ६० व्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागातून बौद्ध धम्म अनुयायांची पाऊले चंद्रपूरच्या दीक्षाभूमीकडे वळू लागली आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर मनपा, पोलीस प्रशासन, एस.टी. महामंडळाने नियोजन केले आहे. दीक्षाभूमीवर १५ आॅक्टोबरपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर १६ आॅक्टोबर रोजी दुपारी मुख्य सोहळा होणार असून त्याकरिता केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
दीक्षाभूमीवर बुद्ध विहाराच्या बाजूला मोठ्या मंडपासह डोम्ब उभारण्यात आला आहे. येथील विचारमंचावरच मुख्य सोहळा होणार आहे. याशिवाय अनुयायांच्या विश्रांतीकरिता वेगळा मंडप टाकण्यात आला आहे. बॅरिकेट्स लावून वेगवेगळे विभाग तयार करण्यात आले आहेत. बुद्ध विहारात दर्शनाला जाण्यासाठी बॅरिकेट्समध्ये रांगेत राहावे लागले. सर्वांनी शिस्तबद्ध दर्शन घेणे अपेक्षित आहे. महाविद्यालयासमोर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. तर दीक्षाभूमीबाहेर रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तेथे बुद्ध मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, पुस्तकांच्या दुकानांसह इतर साहित्य विक्री केली जाणार आहे. वरोरा नाका मार्गावरही स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
१५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धम्मज्योत प्रज्वलन व सामूहिक बुद्धवंदना होईल. सायं. ६.४० वाजता धम्मसमारंभाचे उद्घाटन आंबोरा येथील भदन्त डॉ. नंदवर्धनबोधि महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर राहतील. यावेळी प्रमुख अतिथी अरुणाचल प्रदेशातील भदन्त डॉ. वण्णासामी महाथेरो, नागपूर येथील डॉ. मेत्तानंद महाथेरो, भदन्त सयादव महाथेरो, संदावरा महाथेरो, उत्तमा महाथेरो, सुंदरा महाथेरो, ज्योतिला महाथेरो, तेजानिया महाथेरो, अगासारा महाथेरो, अंगुरा महाथेरो, विरिया महाथेरो तसेच ब्रम्हदेशातील जिंताराम महाथेरो, त्रिपुरा येथील धम्मनाग थेरो, इंग्लड येथील धम्मघोष मेत्ता थेरो आदी उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसांच्या कार्यक्रमांना बौद्ध भदन्त, बौद्ध व आंबेडकरी विचारवंत, समीक्षक साहित्यिक, देश-परदेशातील अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. कुणाचीही गैरसोय होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गेल्या आठवड्यात मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानुसार, मनपाचे दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता करून पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. मनपाने अनुयायांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)

विश्वशांती मिरवणूक
१५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहराच्या मध्यभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्वशांती मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सदिच्छा फलकासह समता सैनिक दलाचे चार वाहनचालक, आयोजक आणि त्यांच्या मागे समस्त बौद्ध बांधव सहभागी होणार आहेत.

अस्थिकलश दर्शनासाठी खुले
तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध राहणार आहे. तसेच थायलंड येथून मिळालेली १६.५ फुट उंचीची बुद्ध मूर्ती दर्शनासाठी खुली राहणार आहे. श्रीलंकेतील बोधिवृक्षाचे दर्शन करता येईल. याचा लाभ घेण्याचे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर यांनी केले आहे.

ग्राफिक आधारित बाबासाहेब जीवनचरित्र प्रदर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित कॉम्प्युटर ग्राफिक प्रदर्शन दीक्षाभूमीवर प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. कॉम्प्युटर ग्राफिकच्या २० स्लाईड्स राहणार आहेत. त्या स्लाईड्सवर छायाचित्राशी संबंधित माहिती चार-चार काव्यात्मक ओळींमध्ये दिली जाईल.

Web Title: Steps to 'Dhamchachra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.