गर्भवती महिलेवर नसबंदी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:33+5:30

वरोरा तालुका मोठा तालुका असून वरोरा शहर हे चारही जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गावर वसलेले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यासह भद्रावती तालुका व यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव तालुक्यातील बरेच रुग्ण आपात्कालीन आरोग्य सेवेसाठी वरोरा येथे येतात. त्यात गर्भवती महिलांच्या प्रसूतिची संख्या जास्त असते.

Sterilization surgery on a pregnant woman | गर्भवती महिलेवर नसबंदी शस्त्रक्रिया

गर्भवती महिलेवर नसबंदी शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देबेजबाबदारपणाचा कळस : वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : काही दिवसांपूर्वी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी एका गर्भवती महिलेवर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बेजबाबदारपणाचा कळस असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
वरोरा तालुका मोठा तालुका असून वरोरा शहर हे चारही जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गावर वसलेले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यासह भद्रावती तालुका व यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव तालुक्यातील बरेच रुग्ण आपात्कालीन आरोग्य सेवेसाठी वरोरा येथे येतात. त्यात गर्भवती महिलांच्या प्रसूतिची संख्या जास्त असते.
त्यामुळे नियमित महिला स्त्री रोगतज्ज्ञ सेवानिवृत्त झाल्याने करारनाम्यावर स्थानिक महिला डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, १८ डिसेंबर २०१९ रोजी वरोरा येथील रहिवासी महिला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी भरती झाली. त्यावेळी तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिला गर्भधारणा झाली असतानाही त्या गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही बाब फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली.
ती महिला गर्भवती असल्याचे कळताच गर्भपात करण्यासाठी तिला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले व घडलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचे काम वरिष्ठ अधिकारी व उपजिल्हा रुग्णालयातील सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केले.
सदर प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक प्रकरण उघडकीस येणार असल्याचेही बोलले जात आहे.

द्वि सदस्यीय समिती गठित
सदर प्रकरण दडपल्याची चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यांनी सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी रुग्णालयातील दोन डॉक्टरांची समिती गठित केली आहे. ही समिती सदर प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.एल दुधे यांनी दिली.

जिल्ह्यातील पहिलीच घटना
आजवर अनेक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतरही महिलांना गर्भधारणा झाल्याच्या घटनाही जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. मात्र एखाद्या गर्भवती महिलेवरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच उघडकीस आली आहे.

सदर प्रकाराबाबतची माहिती कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होताच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कानावर ही बाब टाकली. त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी पाठविले व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी द्वि सदस्यीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या. अहवाल सादर झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
-डॉ. जी.एल दुधे , वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा

Web Title: Sterilization surgery on a pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.