‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 12:45 AM2016-10-16T00:45:16+5:302016-10-16T00:45:16+5:30
येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित होताच प्रचंड खळबळ माजली.
संवर्ग अधिकाऱ्यांनी घेतली बैठक : योग्य वागा अन्यथा परिणाम भोगा
भद्रावती : येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित होताच प्रचंड खळबळ माजली. यासंदर्भात संवर्ग विकास अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून खरपूस समाचार घेतला. येणाऱ्या सोमवारपासूृन मला सर्व सुधारणा दिसल्या पाहिजे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल, असा दम दिला.
१४ आॅक्टोबरला ‘लोकमत’ने पंचायत समितीच्या सर्व विभागांसह परिसरावर पाळत ठेवून स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यात या पंचायत समितीच्या सभापती निवासातील कृषी कार्यालयातील टाकीत रिकाम्या दारुच्या बाटलांसह इतर साहित्य आढळले. तसेच परिसरातसुद्धा दारुच्या रिकाम्या बाटलांचा सडा पडलेला दिसला. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी खर्रा आणि पानाच्या पिचकाऱ्या आढळल्या. संपूर्ण परिसरात वाढलेला कचरा असल्याने स्वच्छतेचे धिंडवडे उडाले होते. कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयीन वेळेत शेजारी असलेल्या पानठेल्यावर असल्याचे आढळले. या सर्व बाबींबाबत संवर्ग विकास अधिकारी तुपे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.
या संदर्भातील वृत्त १५ आॅक्टोबरला ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच चांगलीच खळबळ माजली. सकाळीच संबधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयाखत येऊन दारुच्या रिकाम्या बॉटला आणि इतर ठिकाणच्या घाणीची साफसफाई करून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. दुपारी संवर्ग विकास अधिकारी तुपे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन सर्वांनाच त्यांनी धारेवर धरले. हा प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. जर आपण असेच वागलात तर गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा, असा दम दिला. सभापती निवासात असलेला कृषी विभाग सोमवारलाच अन्यत्र हलविण्याचे निर्देशसुद्धा दिले. बातमीनंतर सर्वच कर्मचारी आपआपली कामे करताना दिसून आले. (शहर प्रतिनिधी)