खिशातून रक्कम चोरली; चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:33 AM2021-09-17T04:33:29+5:302021-09-17T04:33:29+5:30
गोंडपिपरी पोलिसांची कारवाई गोंडपिपरी : शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेतून रक्कम काढून ...
गोंडपिपरी पोलिसांची कारवाई
गोंडपिपरी : शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेतून रक्कम काढून किराणा खरेदी करताना एका व्यक्तीच्या खिशातून २० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याची तक्रार दाखल होताच गोंडपिपरी पोलिसांनी बुधवारी सापळा रचून दुपारच्या सुमारास दोन आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरात नेहमीच वर्दळ असते, तर राष्ट्रीयीकृत बँक म्हणून ओळखल्या जाणारा बँक ऑफ इंडियामध्ये अधिकाधिक खातेदारांचे आर्थिक व्यवहार असल्याने खातेदारांच्या देवाण-घेवाणीवर पाळत ठेवून त्यांच्या रोख रक्कम लंपास करण्याच्या अनेक घटना गेल्या दोन वर्षांमध्ये घडल्या आहेत. ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील किरमिरी येथील मारुती गणपती ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे खरेदीसाठी बँक ऑफ इंडिया शाखा गोंडपिपरी येथून २० हजार रुपये काढले व किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. याच दरम्यान पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या खिशातून रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. बाटूसिंग बिनुसिंग सिसोदिया (वय २४, रा. बजरंगपुरा, ता. जफालपूर, जि. इंदोर) व सहकारी एक अल्पवयीन बालक अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.