त्या गावात दिसतात दगडांची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:11+5:302021-02-13T04:27:11+5:30
नीलेश झाडे गोंडपिपरी : प्रत्येक गावाची ओळख काहीतरी खास असते. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या या गावाची ओळख जरा हटकेच आहे. ...
नीलेश झाडे
गोंडपिपरी : प्रत्येक गावाची ओळख काहीतरी खास असते. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या या गावाची ओळख जरा हटकेच आहे. होय..! या गावाची ओळख येथे सापडणारा दगड आहे. ‘किरमिरी’ असे या गावाचे नाव. आज विटांनी घरे बांधण्याची फॅशन असतानाही येथील दगडाला मागणी आहे. या गावात बहुतांश घरे दगडांनी बांधलेलीच दिसून येतात.
गोंडपिपरी तालुक्यात येणारे किरमिरी हे गाव वर्धा नदीपात्रापासून काही अंतरावर वसलेले आहे. एकीकडे वर्धा नदी, तर दुसरीकडे डोंगर. गावात ३५० ते ४०० घरे आहेत. लोकसंख्या एक हजार ३००. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील ९५ टक्के घरे दगडांनी बांधलेली आहेत. गावाला लागूनच असलेल्या डोंगरात घिसी गोटा मोठ्या प्रमाणात सापडतो. जेव्हा स्लॅबच्या घराची फॅशन नव्हती, तेव्हा येथील दगडांना मोठी मागणी होती. गावातील बहुतांश कुटुंबे डोंगरातील दगड काढण्याचे काम करायचे. दगड काढणे अन् विकणे हाच गावाचा मुख्य व्यवसाय झाला होता. घराच्या बांधकामासाठी गोंडपिंपरी तालुक्यातील बऱ्याच गावांतून ग्राहक येथे गर्दी करायचे. धाबा परिसरातील बहुतांश जुन्या घरांचा पाया किरमिरी येथील दगडांनीच भरलेला आहे. घर बांधकाम असो वा विहीर. दगड किरमिरीचाच असायचा. त्याप्रमाणेच किरमिरी येथील दगडी पाण्याचे टाके प्रसिद्ध होते. या टाक्याला मोठी मागणी होती. लहान आकाराच्या टाक्यापासून ते मोठे टाके येथील गावकरी बनवायचे. आजही अनेक घरांत किरमिरी येथील दगडी टाके दिसतात. टाके बनविण्यासाठी भला मोठा दगड पोखरून काढावा लागत असे. तयार झालेले टाके बैलबंडीने ग्राहकापर्यंत पोहोचविले जायचे.
गावाला लागूनच डोंगर असल्याने या गावातील नागरिकांनी याच दगडाचा वापर घर बांधकामात केला. कवेलूचे घर असो वा स्लॅब. झोपडी असो वा जनावरांचा गोठा. भिंती दगडांच्यांच ठरलेल्या. या गावाची दगडांशी घट्ट मैत्री असली तरी येथील नागरिक मात्र गोड स्वभावाचे आहेत. आज दगडांची घरे फार कमी बांधली जातात. त्यामुळे दगडाला मागणी नाही. त्यामुळे काही गावकरी शेतीकडे वळलेत, तर काही व्यवसाय टाकून बसलेत. काही मजुरी करून उदर्निवाह करीत आहेत. दगडावर पडणारे लोखंडी घन आता धूळखात पडले आहेत. मात्र, गावाची ओळख आजही दगडांचे गाव अशीच आहे.