चंद्रपुरातील डेंग्यू व मलेरियाला रोका, अन्यथा मनपासमोर सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:18+5:302021-09-04T04:33:18+5:30
चंद्रपूर : शहरात वाढत चाललेल्या डेंग्यू व मलेरिया रोगाचे थैमान येत्या आठ दिवसात रोखले नाही तर, मनपासमोर सत्याग्रह करू, ...
चंद्रपूर : शहरात वाढत चाललेल्या डेंग्यू व मलेरिया रोगाचे थैमान येत्या आठ दिवसात रोखले नाही तर, मनपासमोर सत्याग्रह करू, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष व माजी महापौर अंजली घोटेकर यांनी आयुक्तांकडे निवेदनातून दिला आहे.
काेरोनामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता डेंग्यू व मलेरियाने शहरात थैमान घातले आहे. डेंग्यू मुळे नागरिकांचा मृत्यू देखील होत आहे.
मनपाद्वारे काही प्रभागात नगरसेवकांच्या सक्रियतेने फॉगिंग होत आहे. अजूनही बऱ्याच प्रभागात फॉगिंग फवारणी झाली नाही. ती करणे अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही प्रभागात भेदभाव न करता सर्व प्रभागात फवारणी व फॉगिंगची मोहीम राबविली गेली पाहिजे. मनपामध्ये मोठे फॉगिंगचे वाहन एकच आहे. प्रत्येक झोन वाईज एक-एक फॉगिंग मशीन अशा तीन फॉगिंग वाहन मशीन आणि स्प्रे पंप फवारणीसाठी ५० स्प्रे पंप घ्यावे व चांगल्या दर्जाचे औषध वापरावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. येत्या आठ दिवसात जर या उपाययोजना केल्या नाहीत तर, आयुक्त यांच्या दालनामध्ये सत्याग्रह अथवा थाळीनाद करण्याचा इशारा माजी महापौर अंजली घोटेकर यांनी दिला. प्रत्येक प्रभागाचे नियोजन करून तसा चार्ट बनवून प्रत्येक प्रभागात होर्डिंग्ज लावावे व एक खास अधिकारी यासाठी नेमून द्यावा व जनतेला त्याबद्दल माहितीही द्यावी अशी सूचनाही केली. निवेदन देताना भाजप नगरसेविका व महिला मोर्चा महामंत्री शीला चव्हाण, महिला मोर्चा उपाध्यक्ष किरण बुटले, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष रेणू घोडेस्वार, रंजना जेंगठे, सोनू डाहुले व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.