गोंडवानाच्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:46 PM2018-07-26T23:46:21+5:302018-07-26T23:47:06+5:30
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या शिक्षण शुल्का ऐवजी अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या शिक्षण शुल्का ऐवजी अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. याची दखल घेत चंद्रपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत सहमंत्री रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची लूट थांबविण्याची मागणी केली आहे.
अभाविपने निवेदनातून शिक्षण शुल्क कमी करून ज्या विद्यार्थ्यांकडून हे शुल्क आकारण्यात आले, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करण्यासाठी विद्यापीठातर्फे संबंधित विद्यालयांना लेखी सूचना द्याव्यात, विद्यार्थ्यांवर होत असलेला हा अन्याय अभाविप सहन करणार नाही, अशी भुमिका यावेळी रघुवीर अहीर व अभाविप शिष्टमंडळाने कुलगुरूसमोर मांडली. यावेळी कुलगुरूंनी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणाºया सर्व महाविद्यालयांना लेखी स्वरूपात निर्देश देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
विद्यापीठाने परीक्षा शुल्क ठरवून दिली असली तरी अनेक महाविद्यालयाची मुजोरी सुरू आहे. त्यामुळे अनेकदा जादा शुल्क मोजावे लागत असून वारंवार तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून यापुढे असे प्रकार घडल्यास अभाविपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी सहमंत्री रघुवीर अहीर यांनी कुलगुरूंना निवेदनातून दिला.
या शिष्टमंडळात विभाग संघटन मंत्री सौरभ कावळे, गोंडवाना विद्यापीठ प्रमुख शुभम दयालवार, जिल्हा संघटन मंत्री तेजस मोहतूरे, गडचिरोली जिल्हा संयोजक हर्षल गेडाम, नगर सहमंत्री गौरव होकम, यश बांगडे, स्रेहीत लांजेवार, मनिष पिपरे, अंकुश आखरे, कृणाल पाटील, मानवी आक्केवार, वैभव देरकर, अविनाश बहरे, प्रवीण गिलबिले, निखील ठोकळ यांच्यासह संघटनेच्या बहुसंख्य पदाधिकाºयांची उपस्थिती होती.