कृषी केंद्रांकडून बळीराजाची होणारी लयलूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:53+5:302021-09-12T04:32:53+5:30
गोंडपिपरी : शेतीच्या हंगामाने कृषी केंद्रांना सुगीचे दिवस आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी या केंद्रचालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. विस्ताराने ...
गोंडपिपरी : शेतीच्या हंगामाने कृषी केंद्रांना सुगीचे दिवस आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी या केंद्रचालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या गोंडपिपरी तालुक्यासाठी ही बाब आशादायी आहे; मात्र कृषी केंद्रचालकांकडून ग्रामीणांच्या अज्ञानाचा फायदा घेत लुटीचा गोरखधंदा चालविल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांची ही फसगत आता थांबवावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वात गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. संसाराचा गाडा हाकताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. आता नव्या हंगामाची लगबग जोमात आहे. यात गोंडपिपरी शहरासह तालुक्यातील कृषी केंद्रचालकांनी बळीराजाची होणारी लूट आता चर्चेचा विषय ठरला आहे. या कृषी केंद्रचालकांनी बी-बियाणे,खतांच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेण्याचा सपाटा चालविला आहे. केंद्रात साहित्य असताना देखील त्याची साठवणूक करून अधिक पैशाने विकण्याचा प्रकार गोंडपिपरीत नवा नाही. कृषी विभागाने बळीराजाची लूट थांबविण्याची मागणी महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र कुनघाडकर, राष्ट्रवादीचे नेते अरुण वासलवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शैलेशसिंह बैस, आनंदराव गोहणे,अशफाक कुरेशी,विवेक राणा आदींची उपस्थिती होती.
110921\img-20210911-wa0013.jpg
कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना महाविकासआघाडी पदाधिकारी