ऐतिहासिक जुनोना तलावाची उपेक्षा थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:07 AM2020-01-15T01:07:13+5:302020-01-15T01:09:49+5:30
जुनोना तलावाची डागडुजी ब्रिटीश कालावधीत झाली. मात्र, चंद्रपूरच्या गोंड राजानी हा तलाव बांधला आहे. आजही तलाव परिसर व तलावाच्या पाळीवर चंद्रपूरच्या पुरातन गोंड राजांच्या काळातील काही वस्तुचे अवशेष दिसून येतात. या तलावाच्या पाळीची लांबी १५०० मिटर आहे. साडेनऊ मिटरवर राननाला आणि खरकडोह नाल्याचे पाणी साडेपाच किलोमिटर वरून जुनोना तलावात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या गोंडकालीन जुनोना तलावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पुरक असताना आजही उपेक्षा सुरू आहे. राज्य शासनाने आता तरी या स्थळाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विकास करण्याची मागणी पुरातत्त्व अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
जुनोना तलावाची डागडुजी ब्रिटीश कालावधीत झाली. मात्र, चंद्रपूरच्या गोंड राजानी हा तलाव बांधला आहे. आजही तलाव परिसर व तलावाच्या पाळीवर चंद्रपूरच्या पुरातन गोंड राजांच्या काळातील काही वस्तुचे अवशेष दिसून येतात. या तलावाच्या पाळीची लांबी १५०० मिटर आहे. साडेनऊ मिटरवर राननाला आणि खरकडोह नाल्याचे पाणी साडेपाच किलोमिटर वरून जुनोना तलावात येते. १५० हेक्टर पेक्षा अधिक सिंचनाची क्षमता असून ९६ हेक्टर बुडीत परिसर मोडतो. तलावाचा परिसर हिरव्या वनश्रीने तसेच गावालगतच्या शेतीने नटला आहे. त्यामुळे पर्यटनपे्रमी नागरिक विद्यार्थी व हौशी अभ्यासक सहलीच्या निमित्ताने या तलावावर येतात. ही बाब लक्षात घेवून या रमणीय स्थळाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे, जलक्रीडा व इतर सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी असे क्षेत्र भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रशासनाने प्रकल्पस्थळी नौकाविहार, बोटींग प्लॅटफॉर्म, लॅडस्केपिंग फवारे, पार्कीग बालोद्यान, रेस्टारंट, गेस्टहाऊस प्रसाधनगृह, खुले उपहारगृह आदी बाबी प्रस्तावित करून त्यासाठी निविदा मागविल्या, पण प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही, अशी माहिती आचार्य जुलमे यांनी पत्रात नमुद केली.
४ जुलै १९९९ रोजी तलाव, गोंडकालीन महालाच्या १४-१५ व्या शतकातील प्राचीन विटा व इतर अवशेषांचे निरीक्षण छायाचित्रांसह संपूर्ण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तलावाच्या पूर्वेला लोहाराच्या भट्टीतील लोखंडी मळ व मातीच्या भांड्यांचे तुकडे आढळले. या ऐतिहासिक माहितीची उपयोगिता अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने २९ नोव्हेंबर २००१ रोजी जुनोना येथे मुलांच्या खेळणी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पण, त्यानंतर हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
गोंडराजांची दूरदृष्टी
कृषी समृद्धी व जलविहार याचा विचार करूनच गोंड राजांनी जुनोना तलावा निर्माण केला होता. ही दुरदृष्टी आजही उपयुक्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने तलावाचे संवर्धन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची मागणी आचार्य जुलमे यांनी अधिकाºयांकडे केली.