विसापूर फाट्यावर विद्यार्थ्यांचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:27 AM2017-12-14T01:27:21+5:302017-12-14T01:28:11+5:30
तालुक्यातील विसापूर येथील शेकडो विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज चंद्रपूरला ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सकाळी ६.३० वाजता दोन बसची व्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने केली.
अनेकश्वर मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील शेकडो विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज चंद्रपूरला ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सकाळी ६.३० वाजता दोन बसची व्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने केली. त्याच धर्तीवर सकाळी १० वाजता दोन बस सुरू कराव्या म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता विसापूर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले. चिमुकल्यांनी उग्ररूप धारण करून रस्त्यावर ठाण मांडल्याने चालक-वाहन हादरून गेले.
बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १५ हजारांवर आहे. चंद्रपूर मुख्यालयी कामकाजासाठी व शालेय तथा महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाºयांची संख्या मोठी आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या येथे सकाळी ६.१५ वाजता, सकाळी ६.३० वाजता, सकाळी १० वाजता, दुपारी १२ वाजता, दुपारी २ वाजता व सायंकाळी ५ वाजता अशा फेºया आहेत. मात्र, सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थी व नागरिकांची बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी होते. एकच बस असल्याने गर्दीमुळे चिमुकल्यांचा बसमध्ये जीव गुदमरतो. आज बुधवारी सकाळी १० वाजताची बस रेल्वे फाटकाजवळ प्रवासी घेऊन चंद्रपूरला निघाली. दरम्यान, विसापूर फाट्यावर पुन्हा प्रवासी घेण्यासाठी बस थांबताच बसमधील शालेय विद्यार्थ्यांनी बससमोर येऊन रस्त्यावर ठाण मांडले. सकाळी १० वाजतासाठी दोन बसेस देण्यात याव्या म्हणून घोषणाबाजी करू लागले. यामुळे चालक व वाहक हादरून गेले.
चंद्रपुरात नारेबाजी
विसापूर येथील आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी चंद्रपुरातील एसटी डेपो गाठले. तिथे नारेबाजी करून तत्काळ सकाळी १० वाजतासाठी दोन बसेस देण्याची मागणी केली व आगारप्रमुखांना निवेदन दिले.
चंद्रपूर आगारातून सकाळी १० वाजताची विसापूरला एकच बस आहे. यावेळी पासधारक विद्यार्थी मोठ्या संख्येत आहेत. विद्यार्थ्यांना पुन्हा दुसरी बस देण्यासाठी विभागीय नियंत्रकांना विनंती केली. एक-दोन दिवसात सकाळी १० वाजता दररोज दोन बस देण्यात येणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.
- विजय कुडे,
आगार व्यवस्थापक, चंद्रपूर.