बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा रस्त्याचे रुंदीकरण थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:03 PM2018-07-08T23:03:47+5:302018-07-08T23:04:13+5:30
बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या वतीने मागील १ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू होता.
बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा व बल्लारपूर हा मार्ग वनविकास महामंडळ व मध्य चांदा वनविभागाच्या जंगलातून जातो. मागील ४ वर्षात या मार्गावर अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात वाघ, बिबट, अस्वल यांच्या अपघाती मृत्यूची नोंद वनविभागाकडे आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही वनविकास महामंडळाकडून यावर कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे अनेक वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. या रस्त्यावर अनेकदा लोकांना वाघाचे दर्शन झाले. तर कारवा-बल्लारपूर मार्गावर सुद्धा एका रानगव्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. जुनोना-पोंभुर्णा, चिचपल्ली-जुनोना-कारवा-बल्लारपूर हे संपूर्ण जंगलाने वेढलेले रस्ते आहेत. या जंगलात मांसभक्षी व तृणभक्षींची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्रजातीचे साप, बेडूक, पाली, सरडे, पक्षी यांचा अधिवास आहे.
मात्र रात्रीच्या वेळेस चिचपल्ली-जुनोना-कारवा मार्गे बल्लारपूर व पोंभुर्णा-जुनोना मार्गे चंद्रपूर या रस्त्यावर अवैध वाहतूक वाढल्याने अनेक अपघात घडत होते. जुनोनापासून अवघ्या २ किमी अंतरावर काही दिवसांपुर्वी अस्वलीला जीव गेला होता. अपघातात वन्यजीवांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना या सार्वजनिक बांधकाम विभागाला संस्थेच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आल्या होत्या. यावर गंभीरपणे लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण न करण्याची मागणी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली होती.
गतिरोधक उभारून अवैध वाहतूक रोखण्याची मागणी
हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने केलेल्या मागणीची दखल घेत बांधकाम विभागाने रूंदीकरणाचे काम थांबविले आहे. गरजेच्या ठिकाणी गतीरोधक उभारण्यात येणार आहे. वनविकास महामंडळाला चिचपल्ली-जुनोना मार्गावर सायंकाळी ६ वाजतानंतर वाहतूक बंद करण्याची मागणी केली असून अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.