जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:55 PM2019-04-22T22:55:51+5:302019-04-22T22:56:13+5:30
गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या नेतृत्वात नागरिकांनी सोमवारी हे काम बंद पाडून आपला रोष व्यक्त केला.
टिचर कॉलनीतील साई शांतीनगरातील दोन ओपनस्पेसमध्ये सदर काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून पिल्लरवरील प्लास्टर नगराध्यक्षासह नागरिकांनी हाताने काढून दाखवले. यावरून संपूर्ण कामाचा दर्जा लक्षात येतो. वॉर्डात ओपनस्पेस बेवारस अवस्थेत पडलेले पाईप, लोहा, रेती, गिट्टी, सेंट्रिंग इत्यादी ठेवल्या आहेत. त्याचा त्रास होत आहे.
सात वर्षानंतरही काम अपूर्ण
जीवन प्राधिकरणमार्फत सुरू असलेल्या सदर कामाला २२ नोव्हेंबर २०१० साली प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. १० कोटी ३५ लाख, ४२ हजार वित्तीय आकृती बंधनानुसार १२ जानेवारी २०१२ साली नागपूर येथील कंत्राटदाराने काम सुरू केले. काम पुर्ण करण्याचा कालावधी दोन वर्ष इतका होता. मात्र सात वर्षे लोटूनही काम पूर्ण न झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात गडचांदूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
गडचांदूरच्या नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पाणी टाकीतून काही भागात पुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्र ५ मेपर्यंत सुरु होऊन शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल. दोन्ही ओपनस्पेसला सरंक्षण भिंत करून दिली जाईल.
- के.एम. शेख, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,