जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:34 PM2018-01-03T23:34:02+5:302018-01-03T23:34:29+5:30

भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पाळला. बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात व्यावसायिक प्रतिष्ठाने, महाविद्यालये शाळा तथा पेट्रोलपंपही बंद होते.

Stopped in the district | जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देदगडफेक, जाळपोळीने बंदला गालबोट : वर्धेत तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा सौम्य लाठीमार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पाळला. बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात व्यावसायिक प्रतिष्ठाने, महाविद्यालये शाळा तथा पेट्रोलपंपही बंद होते. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगाराच्या बसेस बंद होत्या. यामुळे वाहतूक तुरळकच होती. सकाळपासून आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते मुख्य मार्गाने फिरत असल्याने दुकाने बंद होती. याचा जनजीवनावर मात्र मोठा परिणाम झाला.
वर्धा शहरात सकाळी ८ वाजता काही आंदोलकांनी एकत्र येत रेल्वे स्थानकासमोर शासनाविरूद्ध निदर्शने केली. दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. सकाळी काहींनी सुरू केलेले आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत उग्र झाले होते. शहरातून सहा दुचाकी रॅली, तीन मोर्चे निघाले. दुपारी २ वाजता आंदोलकांनी बजाज चौकात रस्ता रोको आंदोलन सुरू केले. ते सायंकाळी ५.३५ वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान, वर्धा शहरात काही ठिकाणी टायर जाळले गेले. संतप्त जमावाकडून पँथर चौकात दुचाकी जाळण्यात आली. आरती चौकात एका मालवाहूची संतप्त जमावाने तोडफोड केली. काही औषधी दुकाने, खासगी रुग्णालये, शासकीय कार्यालय वगळता अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदच होते.
हिंगणघाट येथील सर्व शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होते. एसटी महामंडळाच्या बसेस सकाळी ११ वाजतानंतर बंद करण्यात आल्या. यानंतर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. शहरात तणावपूर्ण शांतता होती. सेवाग्राम येथेही कडकडीत बंद पाळला गेला. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले. मोर्चेकरांनी गांधी चित्र प्रदर्शन, महात्मा गांधी आश्रमातील दुकाने बंद करायला लावली. मेडिकल कॉलेज चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. प्रवाशांची मात्र अडचण झाली.
समुद्रपूर येथे १०० टक्के बंद पाळला गेला. मुख्य मार्गाने मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजाभाऊ उमरे, नंदू मून, अजय पानेकर, अमित वासनिक, राहुल लोहकरे, अमोल जांगळेकर, राजीव रंगारी, विनायक पाटील, राष्ट्रपाल कांबळे, सूरज डोळे यासह ५०० नागरिक व महिला उपस्थित होते. जाम बसस्थानक व अन्य ठिकाणी रस्तारोको आंदोलन सुरू असल्याने शेकडो विद्यार्थी बसस्थानकावर अडकून पडले होते. त्यांना पोलीस संरक्षणात अकरा बसेसद्वारे त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. सुकळी (बाई) येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यात आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुलगाव येथे आंबेडकरवादी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चपला घातलेल्या पुतळ्यासह मोर्चा काढला. पोलिसांनी स्टेशन चौकात पुतळा ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पुलगाव, नाचणगाव व गुंजखेडा येथे बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, पानठेले, उपहारगृह, भाजीबाजार बंद होते. काही ठिकाणी टायर जाळून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न झाला. स्टेशन चौक, बँक आॅफ इंडिया परिसरात तुरळक दगडफेक झाली. पोलिसांनी अतिरिक्त कुमक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दल तैनात ठेवले होते. किरकोळ जाळपोळ प्रकरणी १५ आंदोलकांना ताब्यात घेत सोडण्यात आले. सकाळी ९ वाजेपर्यंत बसेस सुरू होत्या; पण नंतर बससेवा बंद करण्यात आली. डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलकांनी ठिय्या दिला. काही अज्ञातांनी बँक आॅफ इंडिया बंद करण्याचा प्रयत्न केला. मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक कुंदन जांभुळकर, प्रकाश टेंभुर्णे, डॉ. प्रमोद नितनवरे, अशोक म्हात्रे, चंद्रकांत वाघमारे, विजय भटकर, गौतम गजभिये, अरुण रामटेके, मंगला अंबादे, छाया चव्हाण आदींनी केले. दुपारी २.३० वाजता डीवायएसपी डॉ. दिनेश कोल्हे, ठाणेदार बुराडे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चातून परत जाताना स्टेशन चौकात एका उपहार गृहाच्या मालकाशी आंदोलकांची शाब्दीक चकमक झाली. यामुळे काही काळ तणाव होता.
देवळी शहरात कडकडीत बंद पाळला गेला. शाळा, महाविद्यालये बंद होती. निषेध मोर्चा काढून घटनेला जबाबदार प्रवृत्ती व प्रशासनाचा निषेध केला. मोर्चेकरांनी शहरात फिरून डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा जयजयकार केला. तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात न.प. सदस्य गौतम पोपटकर, सुनील बासू, श्याम महाजन, रितेश लोखंडे, दादा मून, देवानंद मून, मारोती लोहवे, अवधूत बेंदले, बाबा पोपटकर, घनश्याम कांबळे, किरण ठाकरे, पवन देशमुख, मेहेर चव्हाण, अमोल कळसकर, पियुष ठाकरे, आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. बससेवा व खासगी वाहतूक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
सेलू तालुक्यातील हिंगणी येथेही बंद पाळला गेला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. मुख्य चौकात नागरिकांनी आंदोलन केले. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शंभरकर, आशिष कांबळे, शत्रुघ्न कांबळे, जयेश शेख, रामराव कांबळे, मंगेश काळे आदी उपस्थित होते. गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी निषेधाचे नारे लावण्यात आले. गावातील दुकाने, आॅटो सकाळी ८.३० ते १ वाजेपर्यंत बंद होते.
आर्वी येथे बंद पाळण्यात आला; पण मोर्चातील काहींनी नेहरू मार्केट येथील काही दुकानांतील साहित्याची फेकफाक केल्याने मार्केटमधील ३०० ते ४०० व्यापाºयांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. ३००-४०० व्यापाºयांचा जमाव पाहून ठाणेदार अशोक चौधरी यांनी त्वरित मार्केट गाठले. तेथे पाहणी करून व्यापाºयांना यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, आम्ही चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. शहरातील बाजारपेठेसह राज्य परिवहनच्या बसेस १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद होत्या. २ वाजतानंतर काही व्यापाºयांनी दुकाने उघडण्यास सुरूवात केली होती. मोर्चाबाबत उपविभागीय अधिकाºयांनी मंगळवारी प्रा. रवींद्र दारूडे, मेघराज डोंगरे, राजेंद्र नाखले, प्रा. पंकज वाघमारे, दिलीप पोटफोडे, भीमराव मनोहर, नंदागवळी आदींनी निवेदन दिले होते.
कारंजा, आष्टी ठरले अपवाद
महाराष्ट्र बंदचा कारंजा आणि आष्टी शहर व तालुक्यात फारसा परिणाम जाणवला नाही. कारंजा येथे सर्व प्रतिष्ठाणे सुरू होती. व्यवहार सुरळीत होते. मोर्चा वा रॅलीही निघाली नाही. शहरात तथा तालुक्यात पोलीस बंदोबस्त मात्र चोख ठेवण्यात आला होता. आष्टी शहरात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काही काळ दुकाने बंद होती.
बजाज चौकात रस्ता रोको
आंदोलकांनी वर्धा शहरातून दुचाकी रॅली, मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. दुपारी २ वाजता आंदोलकांनी थेट बजाज चौक गाठत रस्तारोको आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सायंकाळी ५.३५ पर्यंत सुरूच होते. या आंदोलनामुळे लहान-मोठ्या व जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे ५.३५ वाजता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करीत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्याकडून दगडफेक होत होती.
पोलीस यंत्रणा रस्त्यावर
जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. शहरात १४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याद्वारे पोलिसांनी आंदोलकांवर करडी नजर ठेवली होती. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. नियंत्रण कक्षातून माहिती घेतली जात होती. शासकीय वाहनांसह पोलीस कर्मचारी खासगी वाहनाने शहरात फेरफटका मारत होते. दुपारी २ वाजता अनेक पोलीस कर्मचाºयांच्या वाहनांतील इंधन संपल्याने व पेट्रोलपंपही बंद असल्याने त्यांना मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागली.
टायर जाळून नोंदविला निषेध
आंदोलकांनी शहरातील विविध भागात टायर जाळून भिमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. इतकेच नव्हे तर काही संतप्त तरूणांनी पँथर चौकात दुचाकी जाळली. आरती चौकात मालवाहूची तथा शिवाजी चौकात काळीपिवळीची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमाव इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी शिवाजी चौकात डिझेल घेऊन जाणाºया मालवाहूला डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला.
रामपच्या ५२५ फेऱ्या रद्द
जिल्ह्यातील रापमची प्रवासी वाहतूक सेवा सकाळी १०.३० वाजेपर्यंत सुरू होती; पण त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेवरून एकही बस सुटली नाही. जिल्ह्यातील ५२५ फेऱ्या बंद होत्या. यात रामपचे १५ ते २० लाखांचे नुकसान झाले. खासगी बसेस डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ उभ्या होत्या. सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात दाखल चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर आदी जिल्ह्यांतील बसेस पाचही आगारांत उभ्या होत्या.
औषधी दुकानेही बंद
संतप्त जमाव व्यावसायिकांना प्रतिष्ठाने बंद करा, असे सांगत होते. अत्यावश्यक सेवांपैकी एक असलेल्या औषधी विके्रत्यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वत:हून दुकाने बंद केली होती.
पालिकेवर धडक
शहरातील बँका, शासकीय कार्यालये वगळता व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. संतप्त जमावाने दुपारी वर्धा नगर परिषद कार्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
पेट्रोलपंप बंद
शहर व परिसरात १५ वर पेट्रोलपंप आहेत. बुधवारी सर्व पेट्रोलपंप बंद होते. यामुळे अनेक नागरिकांना वाहनात पेट्रोल व

Web Title: Stopped in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.