महिलांची सामाजिक पिळवणूक थांबता थांबेना
By Admin | Published: March 8, 2017 12:47 AM2017-03-08T00:47:34+5:302017-03-08T00:47:34+5:30
महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, ....
विविध क्षेत्रात महिलांची भरारी, तरीही अवहेलना
महिला दिन विशेष
प्रकाश काळे गोवरी
महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, तिला तिच्या हक्काची जाणीव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी महिलांची समाजात आजही पिळवणूक होत आहे. यावर आज सामाजिक विचारमंथन करणे काळाची गरज ठरली आहे.
महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा, समाजात सातत्याने होणारी महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्त्रि शक्तीचा जागर केला जातो. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली, तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते.
समाजातच अशा असंख्य कर्तबगार महिला आहेत. त्यांना आपल्या हक्कासाठी लढतांना आयुष्यच मातीमोल करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा हक्क, अधिकार मिळतो, हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे. याचाही जागतिक महिला दिनी विचार झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतू त्यांच्या पाठीमागे लागलेला सामाजिक जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही.
महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यांवर झळकत असले, तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे अधिकार हक्क का मिळत नाही? हे महिलांचे धगधगाते वास्तव आजही कायम आहे. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे आहेत. तरी दिवसेंदिवस महिलांवरी होणाऱ्या अत्याचारास वाढ झाली आहे. केवळ कायदा करून महिलांवरील होणारे अत्याचार रोखता येणार नाही. तर सामाजिक परिवर्तन करून महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तरच जागतिक महिला दिन आपल्याला अभिमानाने साजरा करता येईल.
आज देशभरात जागतिक महिला दिन साजरा होईलही परंतू, स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच मातीमोल झाले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवनसंघर्ष थांबणार कधी हा खरा प्रश्न सर्वासमोर आहे.
न्यायासाठी संघर्ष
सामाजिक विकासात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. महिलांनी प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची ताकद दाखवून दिली आहे. तरीही महिलांची समाजात दिवसेंदिवस वाढत असलेली अवहेलना सामाजिक चिंतेचा विषय झाला आहे. न्यायासाठी महिलांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. न्यायाच्या प्रतिक्षेत महिलांचे आयुष्य आजही मातीमोल झाले आहे.