ट्रक भरून दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:48+5:302021-01-25T04:29:48+5:30
चंद्रपूर : जनावराच्या चाऱ्याच्या आड लपवून वाशिम जिल्ह्यातून मूल येथे दारू वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त ...
चंद्रपूर : जनावराच्या चाऱ्याच्या आड लपवून वाशिम जिल्ह्यातून मूल येथे दारू वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. या कारवाईत सुमारे ३७ लाख ४७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकीजवळ करण्यात आली. नकीब खान अमनुल्ला खान, मोहम्मद अब्दुल मोहम्मद सलीम, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून एमएच २९ एएन २४४४ क्रमांकाच्या ट्रकद्वारे मूल येथील प्रफुल्ल दिलोजवार याच्याकडे दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर चंद्रपूर-मूल मार्गावर नाकाबंदी केली. एमएच २९ एएन २४४४ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता, गुराच्या चाऱ्यात देशीदारूचा साठा लपवून असल्याचे समोर आले. पोलिसांनी देशीदारूच्या ७० पेट्या असा एकूण ३७ लाख ४७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संपी कापडे, जमीर खान पठाण, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, राजेंद्र खनके, जावेद सिद्दीकी, नितीन जाधव यांच्या पथकाने केली. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने चंद्रपुरातील महाकाली कॉलरी परिसरातून दोन लाख ४० हजार रुपये किमतीची २४ पेट्या देशीदारू जप्त केली. तिरुपती झाडे, राजू झाडे हे दोघे फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात राजेंद्र खनके, जमीर पठाण, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, संजय अतकुलवार, चंदू नागरे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, गोपाल अतकुलवार यांच्या पथकाने केली.
बॉक्स
दारूव्यवसायावर आळा घालण्यासाठी आठ पथके
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचा निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात दारूतस्करी व अन्य अवैध व्यवसायावर आळा घालण्याच्या दृष्टीने आठ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे जिल्हाभर पाळत ठेवली जात आहे.