जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळ
By admin | Published: October 21, 2016 01:00 AM2016-10-21T01:00:29+5:302016-10-21T01:00:29+5:30
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे नियोजनशुन्य कारभार व खितपत पडलेले विकास कामे यावर विरोधी जि. प. सदस्य आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
विरोधक आक्रमक : विविध विषयांवर केली सत्ताधाऱ्यांची कोंडी
चंद्रपूर : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे नियोजनशुन्य कारभार व खितपत पडलेले विकास कामे यावर विरोधी जि. प. सदस्य आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे ऐरवी सभागृहात मौन पाळून असलेले सत्ताधारी व विरोधकांच्या फटकेबाजीमुळे गुरूवारची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली.
जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले असून निवडणुकही लवकरच लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ही शेवटची सभा होती. बैलबंडी घोटाळा, जि. प. शाळा इमारतींचे निर्लेखन, रोहयो कामातील गैरव्यवहार, सिंचन विहिरी आदी महत्वपूर्ण विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. अऱ्हेर, नवरगाव आणि पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे अद्यापही निर्लेखन करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांना अडचणी येत असल्याचा मुद्दा काँग्रेस गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी उपस्थित केला. यापुर्वी शाळा इमारती निर्लेखनाचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र सत्र संपण्यावर आले असतानाही शाळा इमारतींची दुरूस्ती होत नाही. निधी उपलब्ध करून न दिल्याने ही परिस्थती उद्भवली आहे. यामुळे सभापती किती गंभीर आहेत, असे म्हणत वारजूकर यांनी सत्ताधारी व शिक्षण सभापतींना धारेवर धरले.
तर शिष्यवृत्तीवरून समाजकल्याण सभापती यांचीही विरोधकांनी कोंडी केली. विरोधकांचे टार्गेट झाल्याने सभापती निलकंठ कोरांगे यांनी संतप्त होवून सभागृहानेच राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर शांताराम चौखे, पेचे, संतोष कुमरे, संदिप करपे, पाटील यांनी त्यांच्या मागणीचे समर्थन केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. रोहयो कामात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. पण सत्ताधारी गप्प होते. याबाबत काहीच माहिती नसल्याने अल्का लोणकर यांनीही रोष व्यक्त केला.
या गदारोळात सतिश वारजुकर यांनी चिमूरच्या बीडीओंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांना पैसे द्यावे लागतात म्हणून रोहयोच्या कामातील कंत्राटाकडे दोन लाख रुपयाची मागणी केली. याप्रकरणी जि.प.ने काय कारवाई केली, अशी विचारणा केली. तसेच चिमुरात रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा अल्का लोणकर, गुणवंत कारेकर, गिता नन्नावरे यांनी उपस्थित केला असता, याबाबत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवून सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तुर्तास या प्रश्नावरील चर्चा थांबली. रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याने याबाबत चौकशी अहवाल सादर करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागविला असून तो सभागृहात आजच सादर करण्याचे आश्वासन दिले. ही सभा रात्री उशीरापर्यत चालली. सभेला सर्व सत्ताधारी व विरोधक तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
सिंचन विहिरींचे अनुदान अदा करा : वारजूकर
जिल्हा परिषदेच्या योजना लोककल्याणकारी असल्या तरी सिंचन विहिरींसाठी अद्यापही अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, हा मुद्दा जि.प. चे काँग्रेस गटनेता सतिश वारजुकर यांनी उपस्थित करून सभागृहाला विषयांची गंभीर लक्षात आणून दिली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील पैसा लावून विहिरींचे बांधकाम केले. मात्र जिल्हा परिषद अनुदान वितरीत करण्यास दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. रोहयोच्या कामात चिमूर तालुक्यात घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत काय कारवाई करण्यात आली असा प्रश्नही गटनेते सतिश वारजुकर यांनी सभागृहात उपस्थित केला. याबरोबर ग्रामीण भागात स्वच्छतागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृहात केली.