जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:54 PM2019-06-03T22:54:28+5:302019-06-03T22:54:56+5:30
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ठिकठिकाणी वादळासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान वादळामुळे अनेक गावांतील छप्पर उळाले तर शेकडो गावांमध्ये काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला. चंद्रपूर शहरातही मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने सायंकाळी नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ठिकठिकाणी वादळासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान वादळामुळे अनेक गावांतील छप्पर उळाले तर शेकडो गावांमध्ये काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला. चंद्रपूर शहरातही मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने सायंकाळी नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले.
शेतकरी खरीप हंगामाकरिता लागवडीपूर्वीची कामे करीत आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन झाले नसले तरी जिल्ह्यात आज वादळासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली. वादळामुळे चिमूर तालुक्यातील किटाळी येथील उपसरपंच कुंदा चावरे, कणीराम सावसागडे यांच्या घरातील जीवनोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली. राजुरा व बल्लारपूर शहरात गारा पडल्या. बसस्थानकाचे नुकसान झाले. कोरपना तालुक्यात बाखर्डी परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
गडचांदूर शहरातही वादळी पाऊस आला. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती व बामणी गावांमध्ये रात्री वीज पुरवठा ठप्प झाला होता. जिवती तालुक्यातील काही घरांवरील टिनाचे पत्रे उडाले. आवारपूर बसस्थानकाजवळील चिंचेचे झाड कोसळल्याने त्याखाली सात दुचाकी व एक टँकर सापडला. गोवरी येथील काही घरांवर झाड पडले. सांगोडा येथेही मोठे नुकसान झाल आहे. चोरा, चंदनखेडा येथे विजेचे खांब कोसळले. घुग्घुस, तोहोगाव लकडक्कोट, लोहारा व कोरपना शहरातही मॉन्सुनपूर्व पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.
वादळी वाऱ्यामुळे स्पार्किंग, तीन घरांना आग
खडसंगी - चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळील सावरी बिडकर येथे दावळी वाºयामुळे स्पर्किंग होऊन तीन घरांना आग लागली. सायंकाळी ५ वाजताच्यादरम्यान चिमूर तालुक्यात जोरदार वादळवारा सुटल्याने सावरी (बिडकर) घरावर असलेल्या जिवंत विद्युत तारांचा एकामेकाला स्पर्श होऊन स्पर्किंग झाली. शेतात असलेल्या घरामागील कुंपणावर आगीची ठिणगी पडली. सावरी येथील नामदेव आदे यांच्या घराला आग लागली. वादळाने ती आग वाढत गेली. यामध्ये नामदेव आदे यांचे पूर्ण घर जाळून खाक झाले. स्वयंपाक घरातील सिलिंडरही आगीच्या भक्ष्यस्थानी येताच स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारच्या आणखी दोन घराला आग लागली. वादळ सुरूच असल्याने आग जास्तच भडकत होती. उशिरापर्यंत आटोक्यात आली नव्हती. गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन शेगाव यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. १ तासांनी पोलीस पोहचले. आग आटोक्यात आणण्याकरिता एसआरके कंपनीचे टँकर आणण्यात आले. चिमूर तहसीलदार नागतीलक यांनी वरोरा येथील फायर ब्रिगेडला पाचारण केले होते.
आवारपूर - कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे जुने चिंचेचे झाड वादळामुळे कोसळले. या झाडांवर मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची घरटी होती. ती उद्ध्वस्त झाली. त्यातील पिलांसह काही पक्षीही मृत्यूमुखी पडले. साई स्पोर्टिंगच्या सदस्यांनी काही पक्षांना सुरक्षितस्थळी नेले.