रेड झोनच्या जागेवरून मनपा सभेत वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:38 PM2018-02-28T23:38:09+5:302018-02-28T23:38:09+5:30
शहरातील रेड झोनमध्ये असलेल्या जागेला केवळ एका व्यक्तीच्या लाभासाठी रहिवासीत रूपांतरीत करण्याचा प्रयत्न बुधवारच्या मनपा आमसभेत झाला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहरातील रेड झोनमध्ये असलेल्या जागेला केवळ एका व्यक्तीच्या लाभासाठी रहिवासीत रूपांतरीत करण्याचा प्रयत्न बुधवारच्या मनपा आमसभेत झाला. त्यामुळे सभेत चांगलेच वादळ उटले. याला विरोधक तसेच सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनीच विरोध केल्याने हा ठराव महापौरांना नामंजूर करावा लागला.
स्वत:च्या पक्षातील विरोधामुळे ठराव नामंजूर करण्याची नामुष्की सभाध्यक्षांवर आली. विशेष म्हणजे, अर्थकारणातून हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याची चर्चा मनपा वतुर्ळात सुरू आहे. गोविंदपूर रिठात पे्रमिला नानकलाल खत्री आणि प्रसन्ना नानकलाल खत्री यांची सर्व्हे क्रमांक २६/१ मध्ये जागा आहे. इरई नदी काठावरील या जागेची नोंद कृषी विभागात आहे. शहरात पूरबाधित क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाने रेड लाइन आणि ब्लू लाइन निर्धारित केली आहे. खत्री यांचीही काही जागा रेड झोनमध्ये तर काही जागा ब्लू झोनमध्ये येते.
खत्री यांच्या जागेच्या उत्तर व पूर्व दिशेने १८ मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता तयार करण्यात आला आहे. शहरातील वाढीव क्षेत्रासाठी विकास योजनेनुसार ही जागा रहिवासी क्षेत्रात अंतर्भूत करण्याची विनंती महानगरपालिका प्रशासनाकडे १५ नोव्हेंबर २०१७ मध्ये केली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने नागपूर विभागाच्या नगररचना विभागाचे सहसंचालक यांच्याकडे याबाबत मार्गदर्शन मागविले होते.
सहसंचालकांनी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, गुणवत्तेनुसार प्रस्ताव मान्य अथवा अमान्य करण्याचे अधिकार शासनाकडे असल्याचे मनपाला कळविले होते. मात्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे सत्ताधाºयांनी हा विषय आमसभेत ठेवल. मात्र या विषयासाठी अर्थकारण झाल्याच्या आरोप करीत सत्ताधाºयांनी ठेवलेल्या विषयाला भाजपच्याच नगरसेवकांनी विरोध करून ठराव नामंजूर केला.
इलेक्ट्रॉनिक काटा, अपंगांचा पाच टक्के निधी, दत्तनगरवासीयांना पट्टे, फॉगिंग मशीन अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. नगरसेवक पप्पू देशमुख, बसपा गटनेता अनिल रामटेके, प्रशांत दानव, सुभाष कासनगोट्टूवार, विणा खनके, झोन सभापती देवानंद वाढई, सुनीता लोढीया, राजेश मून, संदीप आवारी, सुरेश पचारे यांनी प्रश्न उपस्थित केले. सभेला महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
१५ दिवसांत लागणार स्ट्रीट लाईट
मनपा सभेत काही नगरसेवकांनी नव्याने लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट सुरू न झाल्याचा विषय मांडला. येत्या पंधरा दिवसात नव्याने लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट सुरू होतील. तसेच ताडोबा मार्गावर पुन:श्च ताडोबा मार्ग लिहलेले अनेक फलक लावण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी सभागृहाला दिली.