वादळाचा वीज वितरणला जबर फटका
By admin | Published: May 1, 2016 12:28 AM2016-05-01T00:28:56+5:302016-05-01T00:28:56+5:30
बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले.
अनेक गावे ४८ तास अंधारात : खांब वाकले, वीज वाहिन्या तुटल्या, रोहित्रही बिघडले
चंद्रपूर : बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळामुळे घरे क्षतिग्रस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झालेच; सोबत वीज वितरण कंपनीला वादळाचा जबर फटका सहन करावा लागला. केवळ चार तालुक्यातच वीज वितरणचे १४ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. अर्थातच याचा फटका नागरिकांनाही सहन करावा लागला. अनेक गावे ४८ तास अंधारात होती. अद्यापही काही गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची माहिती आहे.
बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. या वादळाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्याला बसला. या पाचही तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला होता. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
दोन दिवस झालेल्या वादळाचा नागरिकांना तर फटका बसलाच; शिवाय वीज वितरण कंपनीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर तालुक्यात उच्चदाबाचे १८ खांब तर ४५ लघुदाबाचे वीज खांब वाकले व तुटले आहेत. चार किलोमीटरपर्यंतची वीज वाहिनी तुटली आहे. यात चार लाख ७८ हजारांचे महावितरणचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यात उच्चदाबाचे ४३ खांब व लघुदाबाचे ७६ खांब वाकले वा तुटले आहेत. १४ किमीपर्यंतची वीज वाहिनी तुटली असून सहा रोहित्रे नादुरुस्त झाले आहेत. यातून सात लाखांचे नुकसान झाले आहे.
वरोरा तालुक्यात उच्चदाबाचा एक खांब व लघुदाबाचे नऊ खांब तुटले आहेत. तीन रोहित्रे नादुरुस्त झाली असून एक किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. यात ८५ हजारांचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात लघुदाबाबे ४२ खांब तुटले असून सहा किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. या तालुक्यातही तीन रोहित्रे नादुरुस्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)