तौक्ते वादळाचे चंद्रपूर जिल्ह्यात पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:42+5:302021-05-17T04:26:42+5:30
चंद्रपूर : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचे पडसाद रविवारी जिल्ह्यातही पाहायला मिळाले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी दुपारी ...
चंद्रपूर : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचे पडसाद रविवारी जिल्ह्यातही पाहायला मिळाले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी दुपारी वादळी वारे सुटले. त्यानंतर अनेक ठिकाणी पाऊसही बरसला.
चंद्रपुरात दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे वाकली तर काहींच्या घराच्या छतावरील साहित्य उडाले. लॉकडाऊन असल्याने चंद्रपुरात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली नाही.
ब्रह्मपुरीत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नागभीडसह तालुक्यातील तळोधी बा. भागातही पाऊस बरसला. कोरपना तालुक्यात सायंकाळच्या सुमारास पाऊस बरसला. वादळामुळे शेतातील मांडवावरील टिनपत्रे उडाले. कुचना-पाटाळा परिसरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस आला. जिवती, पाटण परिसरातही पाऊस बरसला. याशिवाय घुग्घूस, पळसगाव (पि.), भद्रावती, माजरी, आवाळपूर, गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, सिंदेवाही परिसरातही वादळी पाऊस झाला.