वादळी पावसामुळे भूस्खलन?
By admin | Published: March 9, 2017 12:46 AM2017-03-09T00:46:09+5:302017-03-09T00:46:09+5:30
मंगळवारला येथे झालेल्या वादळी पावसानंतर भर वस्तीत, रोडला लागून असलेल्या घराजवळ भला मोठा खड्डा पडला आहे.
बल्लारपूर : मंगळवारला येथे झालेल्या वादळी पावसानंतर भर वस्तीत, रोडला लागून असलेल्या घराजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा एवढा खोल आहे की तो आत कुठपर्यंत खोल गेला आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. या खड्ड्याचे आतील क्षेत्रफळ निदान दहा फूट बाय दहा फूट एवढे असावे. हा खड्डा पेपरमिल काटा गेट समोरील दादाभाई नौरोजी वार्डात सैय्यद रांसुद्दीन यांच्या घराच्या आवाराच्या प्रवेशदाराला लागून पडला आहे.
मंगळवारला येथे वादळी पाऊस येऊन गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. संरक्षक भिंतीच्या सिमेंटी भिमला लागून हा खड्डा आहे. या खड्ड्याचा वरचा भाग सात फूट बाय दोन फूट असा आहे. मात्र आतील भाग बराच पोकळ झालेला दिसून येतो. हा भुस्खलनाचा प्रकार असावा. आत पोकळपणा किती खोल आणि रुंद आहे. याचा अंदाज बांधणे कठीण आहे. या घराला लागूनच डांबरी रोड गेला आहे व रोडच्या खालील भाग पोकळ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, जिथे हा प्रकार घडला आहे, तिथे पाण्याचा पीवीसी पाईप नाली करुन पाच- सहा दिवसांपूर्वीच टाकण्यात आला आहे. तेव्हा तसे काही दिसून आले नाही. परंतु मंगळवारला झालेल्या वादळी पावसानंतर हा प्रकार घडला आहे. उपविभागीय अधिकारी कल्पना निळ (ठुसे), तहसीलदार विकास अहीर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भूगर्भाशास्त्र विभागालाही कळविले आहे.