जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा
By admin | Published: May 3, 2016 01:11 AM2016-05-03T01:11:08+5:302016-05-03T01:11:08+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना यावर्षी निसर्गाने चांगलेच त्रस्त करून सोडले आहे. खरीप हंगामापासूनच
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना यावर्षी निसर्गाने चांगलेच त्रस्त करून सोडले आहे. खरीप हंगामापासूनच निसर्ग नागरिकांवर अवकृपा करीत आहे. आता अकाली पावसाने वैताग आणला आहे. वारंवार होणाऱ्या अकाली पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान होत आहे. मागील आठवड्यात दोन दिवस चक्रीवादळाचा तडाखा बसला. आज सोमवारी पुन्हा जिल्ह्यात वादळी पाऊस येऊन नागरिकांचे नुकसान झाले.
खरीप हंगामापासूनच निसर्ग जिल्ह्यावर कोपला आहे, असेच दिसून येते. खरीप हंगामात पाऊस पडायला पाहिजे. मात्र याच कालावधीत पावसाने दडी मारली. सरासरीच्या तुलनेत संपूर्ण पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाऊसच नसल्याने रबी हंगाम करायचा की नाही, या विवंचनेत शेतकरी होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली. मात्र सिंचनाअभावी यातही अनेकांचे नुकसान झाले. ज्यांनी कशीबशी शेती पिकविली, त्यांचे पीक हाती येत असताना अकाली पावसाने झोडपले. त्यामुळे गहू, चना व इतर रबी पिके अकाली पावसाच्या तडाख्यात खराब झाली. खरीपात आधीच डोक्यावर कर्ज, रबीत पुन्हा नुकसान, यामुळे शेतकरी चांगलाच खचला. पुढील वर्षीही त्यांचे हे नुकसान भरून निघेल की नाही, याची शाश्वती नाही.
खरीप, रबीवर कोपलेला निसर्ग आताही अवकृपाच दाखवित आहे. भर उन्हाळ्यात अकाली पावसाचे थैमान सुरू आहे. केवळ पाऊसच नाही तर गारपीट, वादळी वारा, चक्रीवादळ याचेही तांडव सुरू असल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
मागील आठवड्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली.
तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे चंद्रपूर शहराचा वीज पुरवठा सुमारे एक तास खंडीत होता. तर अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. जिवती, राजुरा तालुक्यातील वीज ४८ तासांपर्यंत पूर्ववत होऊ शकलीनाही.
राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडून नुकसान झाले होते. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शंकर गंधमवार यांचा घरातील सर्व सदस्य जेवण करण्याच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या वादळाने त्यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडवून नेले. काही कळायचा क्षणार्धात सर्व कुटुंब आभाळाखाली आले. जीवीत हाणी झाली नसली तरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.येन्सा परिसरालाही बुधवारी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.
आता पुन्हा आज सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजुरा यासह अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात रात्री ८ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले ते कळू शकले नाही.
फिडर नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठा खंडित
चंद्रपुरात प्रचंड वादळ असल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळामुळे दुकानांसमोर फलक उडाले. काही दुकानांचे नावफलकही तुटून खाली पडले. सायंकाळच्या सुमारास येथील आझाद बागेत आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट असल्याने कुणीही झाडाचा आधार घेतला नाही. त्यामुळे अंधारातच बागेतील लोकांना बाहेर पडावे लागले. फुटपाथवरील दुकानदारांनाही आवरासावर करायला सवड मिळाली नाही.