रात्री वादळवारा, दिवसा विजांच्या कडकडाटासह मुसळधारा
By राजेश भोजेकर | Published: April 22, 2023 04:05 PM2023-04-22T16:05:50+5:302023-04-22T16:07:31+5:30
१२० फूट उंचीचा एक टाॅवरही कोसळला
चंद्रपूर : गुरुवारी रात्री चंद्रपूर शहराला जोरदार वादळाचा सामना करावा लागला. यामध्ये चंद्रपूरातील अनेक घरांचे नुकसान झाले. शिवाय येथील चांदा क्लब ग्राऊंडवर लागलेल्या कृषी प्रदर्शनाचे सर्व मंडप कोसळले. यामध्ये मोठे नुकसान झाले. शिवाय १२० फूट उंचीचा एक टाॅवरही कोसळला.
रात्रभर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. इतकेच नव्हेतर या वादळी वाऱ्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडित झाल्याने शुक्रवारी याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर देखील झाला. काही ठिकाणी पाऊसही कोसळला. यानंतर काही तासांची उसंत मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी २.४५ वाजतापासून पुन्हा वादळाला सुरूवात झाली. यानंतर विजांचा कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी दुपारी कडक उन्हाचा सामना करावा लागल्यानंतर अचानक सायंकाळी वादळ आणि शनिवारी मुसळधार पावसामुळे चंद्रपूरकरांना याचा चांगलाच फटका बसला आहे.