अजबच! एकीकडे म्हणतात, जैविक खत वापरा, तर दुसरीकडे रासायनिक खत खरेदीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 07:00 AM2022-03-31T07:00:00+5:302022-03-31T07:00:06+5:30
Chandrapur News एकीकडे जैविक खतांसाठी जनजागृती तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या खरेदीचे पत्र अशा दुहेरी संभ्रमात बळीराजा अडकला आहे.
प्रवीण खिरटकर
चंद्रपूर : रासायनिक खते व कीटकनाशके पिकांना मोठ्या प्रमाणात दिली जात असल्याने धान्य खाणाऱ्या लोकांवर त्याचे दुष्परिणाम होतात. जमिनीचा पोतही खराब होतो. त्यामुळे पिकांकरिता जैविक खताचा वापर करावा, याकरिता कृषी विभागाने मागील काही वर्षांपासून कंबर कसली आहे. याबाबत जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे रासायनिक खते विकत घ्या, असे पत्र कृषी विभागाने काढले आहे. या अजब फतव्याने शेतकरी संभ्रमात सापडले असल्याचे दिसून येत आहे.
मागील कित्येक वर्षापासून पिके चांगली वाढावीत व उत्पन्न अधिकाधिक व्हावे याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर करीत होते. रासायनिक खताने जमिनीची पोत खराब होतो. धान्य, भाजीपाला खाणाऱ्या व्यक्तीना विविध आजार जडत असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा याकरिता कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जैविक खताची निर्मिती, वापर व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करणे सुरू केले. या शेतकऱ्यांची संख्या सध्या कमी असली तरी शेतकरी जैविक खताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पुढील हंगामाकरिता सध्या रासायनिक खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ती विकत घ्यावीत, अशी सक्ती कृषी विभागाकडून केली जात आहे. जैविक खताचा वापर करण्याकरिता आग्रही असताना तोच विभाग रासायनिक खते विकत घेण्याचा आग्रह करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बँकेचे कर्ज फेडणार की खते घेणार
मागील हंगामात घेतलेले पीक कर्ज मार्च महिन्याच्या अखेरीस भरणा केल्यास पुढील हंगामाकरिता बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देते. त्यामुळे कर्ज फेडावे की खते विकत घ्यावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.