अंधारलेल्या आयुष्यात ‘बुद्धी’चे ‘बळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:58 PM2017-12-11T23:58:10+5:302017-12-11T23:58:33+5:30
जगात पाऊल ठेवले आणि संपूर्ण जगच नजरेआड झाले. जन्मताच मिळालेले अंधत्व नियतीने तिच्याशी खेळलेली क्रूर थट्टाच होती. तरीही या थट्टेला हसतमुखाने स्वीकारत तिने अंधत्व झुगारून बुध्दीचेच डोळे केले.
रवी जवळे ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जगात पाऊल ठेवले आणि संपूर्ण जगच नजरेआड झाले. जन्मताच मिळालेले अंधत्व नियतीने तिच्याशी खेळलेली क्रूर थट्टाच होती. तरीही या थट्टेला हसतमुखाने स्वीकारत तिने अंधत्व झुगारून बुध्दीचेच डोळे केले. बुध्दी आणि त्याचे बळ एकवटून तिने बुध्दीबळात यशोशिखर गाठून स्वत:सोबत आपल्या देशाचेही नाव अजरामर केले. इंदिरा गिलबिले असे या तरुणीचे नाव. वेदनतून जिद्द आणि सामर्थ्याच्या बळावर आनंदाकडे घेऊन जाणारा इंदिराचा हा संघर्षप्रवास आज इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.
इंदिरा गिलबिले ही मूळची गडचांदूर येथील रहिवासी. तिचे वडील शंकरराव गिलबिले हे मोलमजुरी करतात. २७ मे १९८८ रोजी इंदिराचा जन्म झाला. तिचा हा जन्मोत्सव तिच्या कुटुंबीयांसाठी दु:खाचा उत्सव ठरला. इंदिरा जन्मताच दोन्ही डोळ्यांनी अंध होती. एक तर मुलगी आणि त्यातही ती अंध, त्यामुळे हलाकीच्या परिस्थितीत जगणारे गिलबिले कुटुंब हादरून गेले.
नियतीने एका हाताने तिचे डोळे हिरावून घेतले; मात्र दुसºया हाताने तिला चाणाक्ष्य बुध्दी बहाल केली. या बुध्दीच्या बळावरच तिने बुध्दीबळ या खेळाला जवळ केले. पुढे याच खेळाने तिला देशाच्या जवळ केले. इंदिराला बुध्दीबळाची बालपणापासूनच आवड होती. घोडपेठ येथील प्रेरणा अंध विद्यालय आणि कर्मवीर विद्यालयातून तिने क्रीडा कौशल्याचे सामर्थ्य आत्मसात केले. बुध्दीबळ स्पर्धेत लहानमोठ्या कामगिºया केल्यानंतर इंदिराने थेट आंतरराष्टÑीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. २००५ मध्ये अथेन्समध्ये जागतिक अंध महिला बुद्धीबळ स्पर्धेत इंदिरा गिलगिले हिने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करीत जिद्द आणि चिकाटी असली की काहीही अशक्य नाही, हे सर्व विश्वाला दाखवून दिले.
इंदिराला घडवायचीय नवी पिढी
इंदिरा गिलबिलेने केवळ बुध्दीबळच नाही तर शिक्षणातही भरारी घेतली आहे. एम.ए. बीएड्. झाल्यानंतर सध्या ती दिल्ली येथे एका इस्पितळात नोकरी करीत आहे. आजची पिढी हुशार आहे. मात्र व्यसनाच्याही आहारी जात आहे. शिक्षिका होऊन देशाच्या नव्या पिढीला शिक्षित आणि संस्कारित करण्याचा मानस असल्याचे इंदिराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.