प्रस्थापितांविरूद्ध संघर्ष करण्याची बंजारा समाजात ताकद -संजय राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:49 PM2017-09-10T23:49:08+5:302017-09-10T23:49:27+5:30
संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे. मात्र हा संघर्ष करताना आमच्यातील सर्व संघटनांचा वैचारिक एकोपा कायम असला पाहिजे. बंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे. आपले वैचारिक एकमत झाले की, संघर्ष करायला हा समाज कायम तयार असतो. तो आपला बाणा असून समाजात ती उपजत ताकद आहे, असा आशावाद महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चंद्रपुरात रविवारी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्थापन केलेल्या आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या विदर्भ प्रदेशच्या वतीने चंद्रपूर येथील शकुंतला फर्म, येथे आयोजित कार्यकर्ता शिबिर व राज्यस्तरीय मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या विविध क्षेत्रातील समाजबांधवांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाच्या ऐतिहासिक व सध्यास्थिती मांडली. आपला बाणा संघर्षाचा आहे. देशात ८ कोटी असणारा हा समाज महाराष्ट्रातही एक मोठी शक्ती म्हणून उभा आहे. कोणत्याही राजकीय प्रवाहात काम करीत असाल तरी जेव्हा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा प्रश्न असेल तेव्हा सर्व शकले गळून पडली पाहिजे. समाजातील नेत्यांनी, आणि विशेषत: युवकांनी संघटन शक्तीच्या बळावर पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री राजूसिंग नाईक, आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंग तिलावत, राष्ट्रीय कार्याअध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, विमुक्त व भटक्या जाती-जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य श्रावणसिंगजी राठोड, मेहताबसिंग नाईक, अॅड.गोविंद राठोड, तुकाराम पवार, मोहन राठोड, डॉ. तुषार राठोड, अशोक चव्हाण, एन.टी. जाधव, बद्रीप्रसाद चव्हाण, पंकज पवार, भारत राठोड, अॅड जगदीश पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष टी.के.पवार, पंकज तुकाराम पवार, धुमसिंग जाधव, गोवर्धन चव्हाण, लखपती जाधव, प्राचार्य लोपचंद नामदेव राठोड यांनी केले होते. या मेळाव्याला बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.