कोळसा खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:09 AM2019-03-04T00:09:48+5:302019-03-04T00:10:17+5:30
वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे.
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे. परंतु याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. या परिसरात दगडी कोळशाचे जाळे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून त्याठिकाणी कोळसा खाणी तयार केल्या. गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या कोळसा खाणी गावाला अगदी लागून आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येते. नियम धाब्यावर बसवून वेळी-अवेळी ही ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने खदानीलगत असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घरांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. ब्लास्टिंगमुळे शेतातील बोअरवेल पुर्णपणे निकामी झाल्या आहेत. कोळसा खाणी २०० ते ३०० फुट खोल असल्याने परिसरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उन्हाळ्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.
वेकोलिने गावकऱ्यांचा न संपणारा जीवन संघर्ष सुरू केला आहे. कोळसा खाणींची ही धग विनाकारण नागरिकांच्या माथी मारली जात आहे. वेकोलिच्या दुष्परिणामांनी त्यांचे आयुष्यच हादरले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वेकोलिने लादलेल्या समस्यांवर प्रशासनाच्या कोणत्याही जबाबदार लोकप्रतिनिधींना गावकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता आले नाही, हे कोळसा खाण परिसरातील गावातील नागरिकांचे दुर्दैव आहे.
अन्यायाला वाचा फोडणार कोण?
कोळसा खाणींचे निर्माण झाल्यापासून गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरातील गावकऱ्यांना वेकोलिचा मनस्ताप सहन करावा लागतो. गावकऱ्यांचा वेकोलिच्या दुष्परिणामांशी रोजचाच संघर्ष असल्याने नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
३० वर्षांपासून गावकरी त्रस्त
गेल्या ३० वर्षांपासून वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. परंतु आजपर्यंत यावर प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हे गावकऱ्यांचे दुर्दैव आहे. वेकोलितून दिवस रात्र चालणाऱ्या कोळसा वाहतुकीने रस्ते पूर्णत: काळवंडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा सर्व वेकोलितील दुष्परिणामांचा फटका गावकऱ्यांना बसत असतानाही लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.