चंद्रपूर व बल्लारपुरात कडकडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:22+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असून कोरोनाचा केव्हाही उद्रेक होवू शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सातत्याने वाढणारे कोरोना रुग्ण बघता कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने चंद्रपूर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला वरील पाचही शहरातील मोठे व्यापारी, किरकोळ व्यावसायिक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चंद्रपुरातील गजबजलेले मुख्य रस्ते गुरुवारी सकाळपासूनच निर्मनुष्य दिसून आले. दुपारच्या सुमारास तर शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली होती.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असून कोरोनाचा केव्हाही उद्रेक होवू शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून चंद्रपुरातील सराफा व्यावसायिकांनी बुधवारपासून स्वत:हून ‘लॉकडाऊन’ सुरू केले आहे. १६ सप्टेंबरपर्यंत सराफ ा प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. गुरुवारीही शहरातील सराफा दुकाने बंद होती. चंद्रपूर चार्टर्ड अकाऊंन्टट असोसिएशननेही कोरोनाविरूद्ध १० ते २० सप्टेंबरपर्यंत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने ही कार्यालयेही गुरुवारी बंदच होती.
केवळ रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स सुरू
चंद्रपुरातील गुरुवारी शासकीय व खासगी रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापना सुरू होत्या. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंपही सुरू होते. शहातील बँका सुरू होत्या. मात्र ग्राहकांना बँकात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. ग्राहकसेवा बंद ठेवण्यात आली होती. बँकामधील अंतर्गत कामेच तेवढी सुरू होती.
नागरिक घरातच ‘लॉक’
प्रशासनाने पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चंद्रपुरातील जनतेने स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घराबाहेर निघून कोरोना विषाणू घेऊन येण्यापेक्षा चंद्रपूरकरांनी घरीच राहणे पसंद केले. त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेली शहरातील लगबग गुरुवारी शांत होती. एक-दोन वाहनांचा अपवाद वगळला तर फारशी वाहनेही शहरात धावली नाही. त्यामुळे प्रदूषण गुरुवारी फारसे झाले नाही.
किराणापासून फुटपाथवरील दुकानपर्यंत सर्वच ठप्प
चंद्रपुरातील सर्व किराणा दुकाने, भाजी मार्केट, फळांची दुकाने, चहा टपºया व फुटपाथवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अगदी गल्लीबोळातील दुकानेही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. एरवी रस्त्याच्या एका कडेला चार-दोन भाज्यांचा पसारा घेऊन बसलेले किरकोळ भाजीविक्रेतेही गुरुवारी दिसून आले नाही.
बल्लारपुरात शुकशुकाट
बल्लारपूर : जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बल्लारपुरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. व्यापाऱ्यांनी किराणा दुकान, भाजीपाला दुकाने, फळ, पानठेला, चहाटपरी, फुटपाथवरील आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नागरिकही घराच्या बाहेर निघाले नाही. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही फिरताना आढळले नाही. नगर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. बल्लारपुरात एका महिन्यात बाधितांची संख्या ४०० च्या वर गेली आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूला शहरातील सर्व व्यापाºयांनी मनाने सहकार्य केले आहे, अशी माहिती व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष सिताराम सोमानी यांनी दिली.