हजारो हेक्टरवरील पिकांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:47 PM2019-02-17T22:47:48+5:302019-02-17T22:48:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, चिमूर आदी तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, चिमूर आदी तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. याचा जिल्ह्यातील हजारो हेक्टवरील पिकांना जबर फटका बसला. उभे पीक जमिनीवर झोपले. कापून ठेवलेले पीक ओले झाले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
राजुरा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने रब्बी हंगामातील गहु, तूर, ज्वारी, मिरची, हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी गहु, तुर, हरभरा पिकांची कापणी करून ठेवली होती. मात्र, अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पिकांना सुरक्षित झाकून ठेवण्यासाठी एकच तारांबळ उडाली. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, चिंचोली, माधरा, वरोडा, कढोली, चार्ली, निर्ली परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी पाऊस झाला. अचानक पाऊस आल्याने शेतकºयांनी शेतात कापणी करून ठेवलेले पीक पूर्णत: पावसात भिजले.
काही शेतकऱ्यांनी शेतात पिक गोळा करून ठेवले होते. मात्र, राजुरा तालुक्यात सुदैवाने गारपीठ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले नसले तरी रब्बी पिकांना पावसाचा चांगलाच मोठा फटका बसला आहे.
यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावात गारपीट झाली. यामुळे रबी पिके जमिनीवर झोपली. गहू, हरभरा पीक हातून गेले. चिमूर तालुक्यातही रबी पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले.
नुकसानीचे त्वरित पंचनामे करा-मुनगंटीवार
जिल्हयात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही भागात नागरिकांच्या घरांचेसुध्दा नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना दिले आहेत.