सततच्या पावसाने केला कहर
By admin | Published: September 26, 2016 01:08 AM2016-09-26T01:08:09+5:302016-09-26T01:08:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रस्त्यांची लागली वाट : अनेक शेतपिकांना फटका
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गत पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा सोयाबीन, उडीद, मूग पिकांना फटका बसत आहे. तर या पावसाने अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांनी ओलिताची सोय करून पिकांना कसेबसे जगविले. याचवेळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धडाका सुरू आहे. पाच दिवसांपासून सर्वत्र पाऊस पडत असून रविवारीही पाऊस कायम होता.
बुधवारपासून चंद्रपूरसह जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प हाऊस फुल्ल झाले आहेत. शुक्रवारी इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. या पावसाने धान उत्पादकांत आनंद असला तरी इतर पिकांना या पावसाचा धोका वाढला आहे. आणखी काही दिवस पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून शेतकरी सततच्या पावसाने चिंतेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)