पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला; सातारा कोमटी बिटातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 10:45 AM2022-10-21T10:45:09+5:302022-10-21T10:47:16+5:30
शवविच्छेदनानंतर जंगलात केले अंतिम संस्कार
पोंभूर्णा (चंद्रपूर) : बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मानोरा उपवनक्षेत्रातील सातारा कोमटी नियत क्षेत्रातील बीट क्रमांक ४३९ मध्ये सामूहिक गस्तीदरम्यान एक नर वाघ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मृतावस्थेत आढळून आला.
कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या वाघाचा मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सातारा कोमटी बिटातील कक्ष क्रमांक ४३९ मध्ये सामूहिक गस्त करीत असताना एक नर वाघ मृत अवस्थेत आढळून आला. साधारण तीन वर्षांचा हा नर वाघ असून त्याचे सर्व अवयव शाबूत आहेत. वाघ कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाघाचे शवविच्छेदन जंगलातील वन तलावानजीक करण्यात आले. वाघाचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. पी. जांभुळे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, राष्ट्रीय व्याघ्र प्रतिनिधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अवयव पाठविले प्रयोगशाळेत
मृतक वाघाच्या पायावर जखम झाली होती. ही जखम एखाद्या वाहनाने धडक दिल्याने झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सातारा भोसले शेतशिवारात वाघाच्या डरकाळीचे आवाज येत असल्याने तेथील शेतकरी भयभीत होत होते. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहेत.