स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्न करा, यश मिळेलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:27 PM2018-01-13T23:27:32+5:302018-01-13T23:28:12+5:30
जगात काहीही अशक्य नाही. स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते, असा विश्वास राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत एनटीबी महिला प्रवर्गातून प्रथम आलेल्या युगंधरा महाजनवार हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
परिमल डोहणे।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जगात काहीही अशक्य नाही. स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते, असा विश्वास राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत एनटीबी महिला प्रवर्गातून प्रथम आलेल्या युगंधरा महाजनवार हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. नुकत्याच लागलेल्या एमपीएससीच्या निकालामध्ये युगंधराची उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे.
मुळची मूल येथील रहिवासी असलेल्या युगंधराचे वडील पोंभुर्णा पंचायत समिती येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तर आई ही गृहिणी आहे. युगंधराच्या या यशाबद्दल तिच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने दिलखुलास चर्चा करीत तिच्या यशाचे गुपित जाणून घेतले. युगंधराचे प्राथमिक शिक्षण सावली येथील विश्वशांती विद्यालयात झाले. त्यानंतर तिने ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयटी क्षेत्रात पदविकाचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स या विषयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यावेळी विद्यापीठातील स्पॉट सिलेक्शनमध्ये तिची चंदीगड येथे इंजिनिअर म्हणून निवड झाली. मात्र तिने ती नोकरी न स्वीकारता नागपूर गाठून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. नागपूर येथील तिच्याच मैत्रिणीने तिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करण्याचा सल्ला दिला. युगंधरालाही ते पटले. २०१५ मध्ये तिने पुणे गाठून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. दरम्यान, परीक्षेबाबत अधिक माहिती मिळावी, यासाठी तिने शिकवणी वर्ग लावले आणि स्वत:ला याच झोकून दिले. अभ्यासाचा कालावधी वाढविला. पुणे येथील एका अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला. तासन्तास ती अभ्यासिकेत घालवायची. प्रत्येक दिवशी दोन विषयांचा अभ्यास करायचा, त्यामध्ये नियमित वृत्तपत्रांचे वाचण करणे, टिपण काढणे, असा तिचा दिनक्रम सुरू होता. त्यानंतर २०१६ मध्ये तिने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात युगंधराने महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच राज्यसेवा आयोगाची मुख्य परीक्षासुद्धा युगंधराने दिली असून उपजिल्हाधिकारी बनण्याचा मानस तिने ‘लोकमत’जवळ व्यक्त केला आहे.
युगंधरा म्हणाली, अनेकजण आपण स्पर्धेत टिकणार नाही म्हणून त्याकडे कानाडोळा करतात. परंतु प्रयत्न करीत नाहीत. मनात ध्येय निश्चित करुन सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे सुरुवातीला प्रयत्न करा; नंतर त्यात सातत्य ठेवा, यश तुमचेच आहे, असेही ती म्हणाली. आई-वडिलांनीसुद्धा आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविला पाहिजे. माझे आई-वडील नेहमी मला प्रोत्साहित करायचे, त्यामुळे मला अभ्यास करण्यास प्रेरणा मिळायची, असे गुपितही तिने उलगडले.