...तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय; चक्क वस्त्र भंडारात जाऊन मालकाला गोंजारते गोमाता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:42 PM2023-02-15T15:42:06+5:302023-02-15T15:43:47+5:30
चिमुरातील प्रेमाची सुखद घटना
राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) : मुक्या जनावरांवर प्रेम केले तर तेदेखील माणसावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करतात. ही भावना त्यांच्यात निसर्गत:च असते; परंतु काहीजण करंटे असतात. जनावरे मुकी म्हणून त्यांना चुकीची वागणूक देतात. प्रेमाने प्रेम वाढते. याचा नितांत सुंदर प्रत्यय चिमूर येथील पूजा वस्त्र भांडारातील एका घटनेने पुढे आला. तो प्रसंग अनुभवला की ‘हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय’ या कवितेच्या ओळी सहजपणे ओठावर येतात.
चिमूर शहरातील बाजार ओळीत पूजा वस्त्र भांडार नावाने ओमप्रकाश जाकोटीया (मामाजी) यांचे दुकान आहे. या दुकानात सायंकाळी एक गाय दरवाजातून सरळ दुकानात शिरते. एवढेच नाही तर चक्क काऊंटरवर जाऊन ओमप्रकाश जाकोटीया यांना जिभेने चाटून गोंजारते. दुकानमालक मामाजीसुद्धा तेवढ्याच आस्थेने तिला जवळ घेत प्रेम देतात. या गायींचा हा प्रयोग नित्याचाच आहे. मामाजी या गायीला गूळ आणून खायला देतात. गूळ खाऊन झाला की ती दुकानात ग्राहकांसाठी असलेल्या गादीवरच विराजमान होते. हा प्रसंग अनेकवेळा ग्राहकांना आश्चर्यकारक वाटतो. मात्र, या दुकानात ही गाय नित्यानेच येतात आणि तिचा दिनक्रमही ठरलेला आहे. या गायींचा लळा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, ही गाय ओमप्रकाश जाकोटीया यांच्या मालकीची नसून गावातील एका शेतकऱ्याची आहे.
मागील अनेक वर्षांपासून आपल्या दुकानात गाय येतात. या गायींना गूळ तसेच पाणी देऊन त्यांची तहान, भूक भागविली जाते. गोमातेचे प्रेम आपल्याला मिळत असून, यातून समाधान मिळते. यामुळे दुकानाला किंवा आम्हाला कोणताही त्रास नाही.
- ओमप्रकाश जाकोटीया, व्यावसायिक, चिमूर