सिमेंटच्या जंगलात चिऊताईची अस्तित्वासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:07 AM2018-03-20T00:07:17+5:302018-03-20T00:07:17+5:30
‘कावळ्याचे घर शेणाचे, चिऊताईचे घर मेणाचे’ अशी म्हण लहानपणी ऐकायला मिळायची. चिऊताईचे आकर्षणही तेवढेच. भल्या पहाटे कानावर पडणारा चिमण्यांचा किलबिलाट मात्र आता काहीसा कमी झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ‘कावळ्याचे घर शेणाचे, चिऊताईचे घर मेणाचे’ अशी म्हण लहानपणी ऐकायला मिळायची. चिऊताईचे आकर्षणही तेवढेच. भल्या पहाटे कानावर पडणारा चिमण्यांचा किलबिलाट मात्र आता काहीसा कमी झाला आहे. औद्योगिकरणात जंगलाचा ऱ्हास होत आहे. वनाच्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या होत आहे. यातूनच चिमण्यांच्या अस्तित्वावर संक्रात आली असून त्यामुळे आता चिमणी वाचवा-चिमणी जगवाचा संदेश नागरिकांत पोहचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
पूर्वी आपल्या घर-परिसरात चिमणी हमखास दिसायची. मात्र आता ती दिसेनाशी झाली आहे. जुन्या पद्धतीचे मातीचे घर, प्रशस्त वाडे आता कालबाह्य झाले आहेत. अशा घरात मोठ्या प्रमाणात चिमण्यांना जागा मिळायची. येथेच चिमण्या अंडी देत. त्यामुळे ही सर्व जुन्या पद्धतीची बांधकामे चिमण्यांचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने उत्तम होते. मात्र आता स्वच्छ वस्त्या व सिमेंटच्या जंगलात घरांना फटी राहिलेल्या नाही. लाईटच्या मागे, फॅनच्या वर, खिडकीत, झाडावर असे कुठेही घरटी तयार करीत असत. मात्र सततचा निर्माण होणारा कचरा यामुळे चिमण्याची घरटीच आता काढून टाकली जातात. त्यामुळे चिमण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
मानवी वस्ती हेच चिमण्यांचे प्रमुख अधिवास आहे. यामुळेच त्यांना ‘हाऊस स्पॅरो’ सुध्दा म्हणतात. माणसांच्या अधिवासात राहणारा हा पक्षी धान्य, किटक, शिळे अन्न आदी सर्व प्रकारचे खाद्य खाते. चिमण्यांच्या घरट्यात मानवाकडून फेकण्यात आलेले कचऱ्यातील घटक, गवत, कापूस, पिसे आदी आढळू येतात. मात्र वाढत्या शहरीकरण व काँक्रीटीकरणामुळे चिमण्यांची संख्या आता झपाट्याने कमी झाली आहे. आधुनिक पद्धतीचे घर बांधकाम, घरट्याच्या दृष्टीने जागेची कमतरता, शहरातील वाढते प्रदूषण आता तर मोबाईल टॉवर्समधून निघणारे रेडीयेशन आदी कारणांमुळे सुध्दा चिमण्यांच्या संख्येवर परीणाम होत आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासून चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकत मोठी झालेली मुले आता आपल्या लहान मुलांना प्रत्यक्ष चिमणी दाखवू शकत नाही.
नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी
चंद्रपुरातील तापमानामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. त्यातच पाणी टंचाई निर्माण होत असल्याने पाण्यावाचून पक्ष्यांचा तडफडून जीव जाते. यावर्षी तर मानवालाच पाणी मिळणे कठीण जाणार आहे. त्यामुळे पक्ष्यांचीही पाण्यासाठी भटकंती होणार आहे. जागृत नागरिकांनी आपल्या रहिवासी भागात झाडांवर आश्रयास असलेल्या पक्ष्यांकरिता पुढाकार घेण्याची गरज असून एक ‘जलपात्र’ आपल्या घरी, अंगणात, छतावर किंवा गॅलरीमध्ये पाण्याने भरून ठेवावा. कुठे झाडावर दोरीने बांधून सुध्दा व्यवस्था करता येईल. यामुळे अनेक पक्ष्यांना पाणी मिळेल.
वनविभाग चिमणी वाचवा, चिमणी जगवा यासारखे कार्यक्रम राबवित आहे. पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थाही चिमणी संवर्धनासाठी जनजागृती करतात. नागरिकांनीही चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कुत्रिम घरटे आपल्या घर-परिसरात ठेवावे.
- बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षक तथा अध्यक्ष इको-प्रो.