एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:00+5:30
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती.
साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती. राज्यात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ घटकांना ३३ टक्क््यांपासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवाश्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे. लॉकडाऊनपूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र २१ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांना स्मार्टकार्डसाठीची प्रक्रिया या कालावधीत करता आली नाही. यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या प्रवाश्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्यांना अद्यापही स्मार्ट कार्ड काढता आले नाही त्यांच्यासाठीही ही बाब दिलासादायक आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यांतर्गंत बस सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाश्यांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी भविष्यात प्रवाशी वाढतील, असा अंदाज महामंडळाने व्यक्त केला आहे.
एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच मुदतवाढ दिली होती. लॉकडाऊनमुळे अनेकांना एसटी महामंडळाच्या सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्टकार्ड काढता आले नाही. ही बाब विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने स्मार्टकार्ड काढण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.
- आर. एन. पाटील,
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर