विद्यार्थी जेव्हा बांबूच्या शेतीत उतरतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:45 PM2018-05-06T23:45:07+5:302018-05-06T23:45:46+5:30
‘भारताच्या इतिहासात एका टप्प्यावर हात व डोके यांची फारकत झाली. डोक्याने काम करणाऱ्याने हात वापरणे कमीपणाचे मानले आणि हाताने काम करणाºयाने डोके वापरू नये, अशी व्यवस्था अस्तित्वात आली. ती मोडायची तर डोके, हात व हृदय या तिन्हींचाही संयोग साधणारे शिक्षण हवे’ अशी भूमिका शिक्षणतज्ज्ञ डॉ.केलबाग यांनी मांडली.
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘भारताच्या इतिहासात एका टप्प्यावर हात व डोके यांची फारकत झाली. डोक्याने काम करणाऱ्याने हात वापरणे कमीपणाचे मानले आणि हाताने काम करणाºयाने डोके वापरू नये, अशी व्यवस्था अस्तित्वात आली. ती मोडायची तर डोके, हात व हृदय या तिन्हींचाही संयोग साधणारे शिक्षण हवे’ अशी भूमिका शिक्षणतज्ज्ञ डॉ.केलबाग यांनी मांडली. आजच्या पारंपारिक पुस्तकी शिक्षण पद्धतीने नेमके हेच सुत्र गायब केले. त्यामुळे पदव्यांची पुंगळी घेवून बेरोजगारांची फौज तयार झाली. कौशल्याधारित तांत्रिक शिक्षणात आता सकारात्मक बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील १४ विद्यार्थ्यांची पहिली बॅच नवी ऊर्जा घेवून बाहेर येत आहे.
देश आणि राज्याच्याच एकूण सकल उत्पन्नातून शिक्षणावर सहा टक्के रक्कम खर्च करावी, अशी शिफारस अनेक तज्ज्ञ समित्यांनी केली आहे. ही टक्केवारी कोणत्याही सरकारला गाठता आली नाही. तीन टक्क्यांच्या आसपास घुटमळणे सुरू आहे. पण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणावर अधिक भर देवून मानवी भांडवलाचा विकास करणाºया अभ्यासक्रमांची संख्या बरीच वाढली. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून अर्थनिर्भर होण्याची संधी या अभ्यासक्रमांनी उपलब्ध करून दिली. अर्थात नोकरी मिळविण्याच्या स्पर्धेत जो टिकेल तोच ‘यशस्वी’ ही मानसिकता बदलविण्यासाठी स्थानिक स्तरावरच उपलब्ध रोजगाराभिमुख संसाधनाचा फारसा गंभीरतेने विचार झाला नाही.
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास बांबू आधारित महत्त्वाकांक्षी व रोजगाराला चालना देणारी देशपातळीवरील अग्रगण्य संस्था उभी होणे, हे एक दिवास्वप्न वाटत होते. राजकीय घोषणा आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी या बाबी भिन्न आहेत. धोरणांविषयीचा सच्चेपणा असेल तरच या बहुगामी संस्थांची पायाभरणी होऊ शकते.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दूरदृष्टी व विकासनिष्ठ नेतृत्वामुळे राज्य शासनाने ४ डिसेंबर २०१४ च्या निर्णयान्वये चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली.
शहरी, ग्रामीण व आदिवासी समुहातील विद्यार्थी, शेतकरी तसेच महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या केंद्राने दीर्घकालीन प्रकल्पांचे नियोजन केले आहे. एक-दोन अभ्यासक्रमांचा अपवाद वगळल्यास काही अभ्यासक्रमांनी तर बाळसेही धारण केले नाही. डौलदार इमारत उभारणीची पायाभूत कामे सुरू असल्याने प्रशिक्षण केंद्राचा प्रपंच तुकड्यातुकड्यांनी विभाजित झाला आहे. रोजगार व स्वयंरोजगार, बांबू उद्योग शेतीची शक्ती उरात जोपासणाºया संस्थेची सर्व पायाभूत विकासकामे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे.
२९ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू झालेल्या बांबू पदविका अभ्यासक्रमात शेतकरी-कष्टकºयांच्या १४ मुलांनी प्रवेश घेतला. त्यामध्ये सहा विद्यार्थिनी व आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बांबू संशोधन केंद्राच्या स्थापना इतिहासातील ही पहिलीच बॅच ‘लोकमत’ने बोलते केली असता त्यांच्या जाणीवा समृद्ध होत असल्याचा प्रत्यय आला. या विद्यार्थ्यांना उड्डाणाचा जणू आकाश गवसला आहे.
चंद्रपूर बाबंूपासून वस्तुनिर्मितीसाठी देशात प्रसिद्ध होईल - ना. मुनगंटीवार
बांबू हा आधुनिक युगाचा कल्पवृक्ष असून अन्न, वस्त्र, निवारा या मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता बांबू या वनउपजामध्ये आहे. आणि याच कारणाने वनमंत्री म्हणून बांबूची शेतकºयांनी लागवड मोठ्या प्रमाणावर करावी. यासाठी अनेक वर्षांपासून असणारा टॉन्झीट पासचा नियम मी राज्यातून कायम संपवला. बांबू लावणे, त्याची तोड करणे आणि ने-आणसाठीची बंधने हटविली. आणि त्याचा फायदा महाराष्ट्रात केंद्र सरकारने मुल्यांकन केले. त्यामध्ये ४,५०० क्वे. कि.मी.ने बांबू क्षेत्र वाढले. आता बांबूपासून तयार होणाºया वस्तु, प्रशिक्षण, संशोधन व डिझायनिंग असे एक केंद्र चिचपल्लीत उभे करतो आहे. साधारणत: आज ६०० महिलांना शाश्वत रोजगार या कार्यक्रमामुळे प्राप्त झाला असून भविष्यात ही संख्या दहा हजारापर्यंत नेण्याचा मानस आहे. उत्तर प्रदेशचे मुरादाबाद हे ब्राँझच्या धातूपासून वस्तुनिर्मितीसाठी प्रसिद्धी आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा देशात बांबूपासून तयार होणाºया वस्तुच्या निर्मितीबद्दल प्रसिद्ध होईल. हा विश्वास आहे. आणि त्यासाठी आपल्या राज्यातले हे एकमात्र असे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र बनवल्या जात आहे.
बेरोजगारीले भेवाचा नाय
गावातल्या बचत गटवाल्या ताईकडून चिचपल्लीच्या केंद्राची माहिती भेटली. वाढईकामाची आवड होती म्हणून अॅडमिशन घेतली. जंगल, मातीत कष्ट कराले लाजबिज काही नाही. बांबूच्या लयी वस्तू बनविता येते. नर्सरी करता येते, आता बेरोजगारीले भेवाचा नाय, ही उत्तरे ऐकली की प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा अंदाज लक्षात येतो.
विद्यार्थी नव्हे बांबूदूत
बांबू तंत्रज्ञानावर आधारित दोन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी पहिल्या सत्रात १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विविध विषयांवर ज्ञान प्राप्त केलेले हे विद्यार्थी ‘बांबू दूत’ म्हणून कार्य करण्याइतपत सक्षम झाले आहेत. दशरथ रामटेके (छोटा नागपूर), प्रज्ञा वाळके, अण्णपूर्णा धुर्वे, घनश्याम टोंगे (चंद्रपूर), निर्मला इटनकर (बल्लारपूर), साकीब खान (गडचिरोली), हेमराज धुर्वे (ब्रह्मपुरी), भीमराज दुर्गे (मुठरा), रोशन शेडमाके (सोनापूर), सुरेश कंकडवार (धनोली) आदींचा पहिल्या बॅचमध्ये समावेश आहे.
बांबूचा खरा अर्थ कळला
गावखेड्यातील जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून बांबूची ओळख आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बांबूची साथ असते. पण, बांबूने आर्थिक दुष्टचक्रावर मात करता येते, याची जाणीव फार उशिरा झाली. आम्ही या केंद्रात प्रवेश घेतला नसता तर सुप-टोपल्यांच्या पलिकडे जाता आले नसते. आत्मविश्वास वाढला, बांबूचे शेकडो प्र्रकार समजून घेण्याची दृष्टी मिळाली, अशी प्रतिक्रिया पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.