विद्यार्थी वेठीस : चौकशीचे आदेश
By admin | Published: December 30, 2014 11:30 PM2014-12-30T23:30:43+5:302014-12-30T23:30:43+5:30
सिनाळा येथील बिटस्तरीय शालेय संमेलनाच्या आयोजकांनी नियम धाब्यावर ठेवून रात्री १.३० वाजेपर्यंत मोकळ्या मैदानात थंडीत विद्यार्थ्यांना कुडकुडायला लावले. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त
चंद्रपूर : सिनाळा येथील बिटस्तरीय शालेय संमेलनाच्या आयोजकांनी नियम धाब्यावर ठेवून रात्री १.३० वाजेपर्यंत मोकळ्या मैदानात थंडीत विद्यार्थ्यांना कुडकुडायला लावले. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच या प्रकरणाची मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांना पत्र देवून अहवाल मागितला आहे. विशेष म्हणजे, यानंतर ज्या काही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या स्पर्धांमध्ये वेळेचे भान ठेवूनच स्पर्धा घ्याव्या, असे कडक आदेश देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या बिटस्तरीय शालेय क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. परिसरातील दहा ते बारा शाळांना सहभागी करून विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी सकाळच्या सत्रात या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सायंकाळपासून संबंधित गावातच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या सांस्कृतिक कार्यक्रमामागील उद्देश आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. मात्र कार्यक्रमांचे आयोजन करताना नियमांचे काटेकोर पालन व मर्यादेचे भान ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना रात्री थंडीत कार्यक्रम करण्यास भाग पाडले एवढेच नाही तर त्यांना जेवनही वेळेवर देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.
याप्रकरणी आता आयोजकांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी सलिल यांनी दिले आहे. यासंदर्भात अहवाल मागितला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत असलेल्या एका शाळेतील बिटस्तरीय कार्यक्रमामध्ये काही शिक्षकांनी रात्री विद्यार्थी आणि शिक्षिका झोपून असलेल्या खोलीच्या बाहेर धिंगाना घातला. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षीका भयभित झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. असे प्रकार टाळण्यासाठीही कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)