जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थिनी झाली अभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:50+5:302021-01-21T04:25:50+5:30
‘जिल्हा परिषद शाळा यशोगाथा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत डायट चंद्रपूर अंतर्गत गट साधन केंद्र शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ प्रा. भारत मेश्राम ...
‘जिल्हा परिषद शाळा यशोगाथा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत डायट चंद्रपूर अंतर्गत गट साधन केंद्र शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ प्रा. भारत मेश्राम व सहकारी विषयतज्ज्ञांनी जिल्हा परिषदेचेे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कार्डिले यांची प्रेरणा, डायट चंद्रपूरचे प्राचार्य प्रा. धनंजय चाफले यांचे मार्गदर्शन व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांच्या नेतृत्वात अभियंता स्नेहल गेडाम हिच्याशी संवाद साधला. जिल्हा परिषद शाळेतील भक्कम प्राथमिक गुणवत्ता शिक्षण व प्रयोगशील अध्यापकांमुळे अभियंता पदावर पोहोचल्याचे तिने सांगितले. माध्यमिक शिक्षण नवरगाव येथील लोकसेवा विद्यालय व त्यानंतर ज्ञानेश कनिष्ठ महाविद्यालय येथे तिने शिक्षण पूर्ण केले. उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण होऊन शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर येथे प्रवेश मिळविला. पदवीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ती सिंदेवाहीतील जलसिंचन विभागात साहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहे.
विषयतज्ज्ञ प्रा. मेश्राम यांनी यापूर्वीही तालुक्यातील तीन विविध सरकारी विभागांत मोठ्या पदावर काम करीत असलेल्या माजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी राहिलेल्या व आजमितीस अधिकारी असलेल्या व्यक्तींच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.