विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:21 PM2018-07-06T23:21:15+5:302018-07-06T23:21:48+5:30
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
सुरेश रंगारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविली जातात. शासनाची यंत्रणा शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधीच पुढील सत्राची विद्यार्थ्यांची संभाव्य संख्येची माहिती शाळांकडून मागविल्या जाते. त्यानुसार पुस्तकांची छपाई केली जाते. त्यानुसार शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा अपेक्षित आहे. २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्यास आठवडा पुर्ण होत आहे. तरीही विद्यार्थ्यांना पुर्ण विषयाचे पुस्तके मिळाले नाही. केंद्रामध्ये पुस्तके पाठविण्यात आले. मात्र त्यात पुस्तकांचा पुरवठा अपुरा होता.
पुस्तके वाटप करतानाही मागणीनुसार वाटप न करता काही शाळांना जास्तीचे तर काही शाळांना कमी पुस्तकांचे वाटप केल्याने संस्थेनुसार पुस्तके विद्यार्थ्यांना मिळू शकले नाही व अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिले. काही विद्यार्थी जुन्या पुस्तकांचा वापर सुरू केला आहे. मात्र यावर्षी आठवीच्या वर्गाची पुस्तके बदलविण्यात आली असल्याने जुने पुस्तके वापरू शकत नाही व पुस्तके बाजारात विक्रेत्याकडे उपलब्ध नाही. परिणामी आठवीचे विद्यार्थी पुस्तकाविना शाळेत जात आहेत. पुस्तके विद्यार्थ्यांना न मिळाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
बल्लारपूर तालुक्यात बारा हजार पुस्तकांची मागणी
बल्लारपूर तालुक्यात १२ हजार पुस्तकांची मागणी करण्यात आली. मागणीनुसार मराठी, हिन्दी, उर्दू, तेलगु माध्यमांची तसेच सेमी मराठी, हिंदी, उर्दू व तेलगु माध्यमाची पुस्तके पुरवठा करण्यात आला. मात्र वाटपात सावळागोंधळ झाल्यामुळे व शिक्षकांची अधिकचे पुस्तके घेतल्याने विद्यार्थ्यांना विषयानुसार पुस्तके मिळू शकली नाहीत.
गणवेशाचीही प्रतीक्षा
शासनाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम अन्वये वर्ग १ ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ६०० रू. अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रावधान आहे. शाळा सुरू झाल्यापुस्तके प्राप्त होत आहेत. मात्र विद्यार्थी व पालक गणवेश घेण्यासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने नवीन गणवेश खरेदी केल्या गेला नाही. विद्यार्थी शाळेत रंगीत कपड्यात येत आहेत.
तालुक्यातील शाळेच्या मागणीनुसार पुस्तकांचा साठा केंद्रस्तरावर पाठविण्यात आला. मात्र केंद्रातून पुस्तक वाटपात गोंधळ उडाला. काही शाळांना विषयांकीत तसेच पुरेसे पुस्तके प्राप्त झाली नाहीत. आढावा बैठक घेवून त्यात जास्त पुस्तके प्राप्त शाळातून परत मागवून कमी गेलेल्या शाळांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
-शोभा मडावी, गटशिक्षणाधिकारी,
बल्लारपूर पंचायत समिती.