शाळेत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले जाते भांडे साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:17 PM2024-08-01T15:17:17+5:302024-08-01T15:18:37+5:30
ना-सुविधा, ना सीसीटीव्ही कॅमेरे : पालकांनी व्यक्त केला रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क भांडे साफ करून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी पालक-शिक्षक सभेत समोर आला. यासोबतच शाळेतील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात, सुरू असल्यास शिक्षक बंद करुन ठेवत असतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही सोई- सुविधा पुरविल्या जात नाहीत, अशा तक्रारी पालकांनी पालक सभेत केल्या. बाबूपेठ येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी मूकबधिर आश्रमशाळा चालवली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून येथे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबतच्या तक्रारीही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे गेल्या होत्या. दरम्यान, या शाळेत ३० जुलै रोजी पालक- शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेला मुख्याध्यापक चौधरी, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती. पालक सभा सुरु होताच पालकांनी विद्यार्थ्यांना सोई-सुविधा पुरविण्यात येत नसल्याबद्दल रोष व्यक्त केला. तसेच शिक्षक मुलांची काळजी घेत नाहीत, वैद्यकीय मदत पुरवत नाहीत, मुलींना शाळेत प्रवेश देत नाहीत, पालकांना सहकार्य करत नाहीत, विचारपूस केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. मुलांकडून भांडे साफ करून घेतात, शाळा जास्तीत जास्त बंदच असते, मुले-मुली शाळेत सुरक्षित नाहीत अशा तक्रारींचा पाढाच पालकांनी वाचला
विद्यार्थ्यांना 'गुड टच-बॅड टच'चे दिले धडे
शिक्षक-पालक सभेचे औचित्य साधून भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांनी विद्यार्थ्यांशी ट्रान्स्लेटरच्या मदतीने संवाद साधत गुड टच- बॅड टच' तसेच पोक्सो कायदा, डायल ११२, वाहतुकीचे नियम, धूम्रपानाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
भरोसा सेलच्या पाहणीत काय आढळले
पालक-शिक्षक सभेत भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांची उपस्थिती होती. पालकांच्या तक्रारी ऐकताच त्यांनी स्वतः शाळेची व वसतिगृहाची तपासणी केली. यावेळी शाळेत सीसीटीव्ही नाही, जेथे आहेत ते कॅमेरे शिक्षक बंद ठेवतात, बहुतेक वेळा शाळा बंदच असते, मुलींची संख्या केवळ दोनच आहे. याबाबत पालकांना विचारणा केली असता, मुले-मुली शाळेत सुरक्षित नाहीत असे सांगितले. तर वसतिगृहाच पाहणी केली असता, वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा नाही, सुरक्षा भित सुरक्षित नाही, स्वच्छतागृह सुरक्षित नाही. यासंदर्भातील अहवाल पीएसआय मेश्राम यांनी पोलिस अधीक्षकांना सादर केल्याची माहिती आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.