विद्यार्थ्यांना जनावरांसारखी वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:35 PM2017-08-27T22:35:09+5:302017-08-27T22:36:01+5:30
पैसे वाचविण्याच्या नादात वर्ग पाचवी ते बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रकमध्ये चक्क जनावरांसारखे कोंबून क्रीडा स्पर्धेसाठी नेले जात असल्याचा प्रकार .....
प्रवीण मेकर्तीवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सुब्बई : पैसे वाचविण्याच्या नादात वर्ग पाचवी ते बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रकमध्ये चक्क जनावरांसारखे कोंबून क्रीडा स्पर्धेसाठी नेले जात असल्याचा प्रकार लोकमतच्या पाहणीत आढळून आला आहे. राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील श्री शिवाजी आश्रमशाळेतील या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित श्री शिवाजी आश्रमशाळा सुब्बई येथे सुरु आहे. या शाळेमधील विद्यार्थी वसतिगृहात निवासी राहतात. परंतु या ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होत असल्याचा तक्रारी आहेत.
विशेष म्हणजे, सदर शाळा अतिदुर्गम भागात आहे. शाळेबाबत अनेक तक्रारी असल्या तरी कोणतेही प्रशासकीय अधिकारी चौकशीसाठी या शाळेत आले असता ते येण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापनाला त्याची भनक लागते. त्यामुळे शाळेतील गैरकारभार उघडकीस येत नाही.
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याबाबतचे वृत्त यापूर्वीच ‘लोकमत’ने प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित केल्यानंतर अधिकाºयांकडून धातूर-मातूर कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे आश्रमशाळेतील भोंगळ कारभार काही कमी झालेला नाही.
२८ ते ३० आॅगस्ट या दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा देवाळा येथील आश्रमशाळेत आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सुब्बई येथील आश्रमशाळेने आपले ८० विद्यार्थी पाठविण्याचे ठरविले. यात ४४ विद्यार्थी तर ३६ विद्यार्थिनी आहेत. या वर्ग पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व ८० विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळा व्यवस्थापनाने एका ट्रकमध्ये चक्क जनावरांप्रमाणे कोंबून आज रविवारी देवाळा येथे रवाना केले. शासनाकडून अनुदान दिले जात असले तरी केवळ पैसे वाचविण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या माथी हा जीवघेणा प्रवास लादला जात आहे.
प्रवासात शिक्षक नाही
विशेष म्हणजे, क्रीडा स्पर्धांसाठी सुब्बई आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना देवाळा येथे एकाच ट्रकमध्ये कोंबून नेणे अन्यायकारक आहे. असे असताना दुसरा संतापजनक प्रकार म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत एक शिक्षक पाठविण्यात आला नाही. क्रीडा शिक्षकही या प्रवासात विद्यार्थ्यांसोबत नव्हते.
क्रीडा स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. खासगी वाहनाने त्यांना नेण्यात आले. प्रवासात क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत होते की नाही, याबाबत माहिती नाही.
-व्ही.व्ही. कोडापे,
अधीक्षक, सुब्बई आश्रमशाळा.