दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:56 PM2023-02-10T15:56:46+5:302023-02-10T15:58:24+5:30

भर उन्हात रस्ता अडवून बसले पाटागुडा येथील जिप शाळेचे विद्यार्थी

Students block the road in the sun to take action against the teachers who absent all the time | दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको

दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको

googlenewsNext

जिवती (चंद्रपूर) : तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत दांडी बहाद्दर शिक्षक येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘आम्हाला शिक्षक द्या हो शिक्षक’ म्हणत शाळेतील पूर्ण विद्यार्थ्यांनीच एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना समोर आली आहे आणि ती तेजीने समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे.

शाळेत शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले. हे प्रकरण पाहत गावचे पोलिस पाटील यांनी टेकामांडवा येथील पोलिस प्रशासनाला माहिती दिली असता सहायक उपपोलिस निरीक्षक रवींद्र म्हैसकर हे आपल्या ताफ्यासह शाळेत पोहाेचून विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी केंद्रप्रमुख बावणे यांनी सांगितले की, तालुक्यात ५८ शिक्षकांची रिक्त पदे आहेत. यावर चार दिवसांत शिक्षक देऊन समस्या सोडवू, असे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे, मुलांना दुपारचे जेवणही नव्हते भर उन्हात चटके सहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. विद्यार्थी सांगत होते की, आम्ही यावर्षी क्रीडा स्पर्धांची तयारीही केली; परंतु, आम्हाला क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही. यावेळी पोलिस पाटील, पोलिस प्रशासन, केंद्रप्रमुख यांनी मुलांची समजूत काढली.

सुटी मंजूर नसतानाही शिक्षक जातात रजेवर

पाटागुडा येथील जि.प. शाळा इयत्ता सातवीपर्यंत असून ७२ एवढी पटसंख्या आहे. सदर शाळेतील शिक्षक कधी सुटीवर तर कधी अवेळी येतात. रजा मंजूर नसतानादेखील सुटीवर जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वरिष्ठांना सहा महिन्यांपासून कळविण्यात येत असल्याचे शा.व्य. समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी सांगितले.

पाटागुडा येथील दोन शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आजपासून जि.प. शाळा पाटागुडा येथे दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

- डॉ. भागवत रेजिवाड, गटविकास अधिकारी, पं.स. जिवती

Web Title: Students block the road in the sun to take action against the teachers who absent all the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.