विद्यार्थ्यांची गणवेशधारी सेवेला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:34 PM2019-03-20T22:34:28+5:302019-03-20T22:34:49+5:30
राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करता यावे, ...
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करता यावे, या हेतुने राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (विद्या प्राधिकरण) ने राज्यस्तरावर एकाच दिवशी कलचाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणवेशधारी शासकीय सेवेला पहिली पसंत दिली तर वाणिज्य शाखेला द्बितीय प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन यासंदर्भात मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आवडीच्या क्षेत्राची अभ्यासशाखा निवडून भविष्यात उत्तम करिअर करता यावे, याकरिता राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (विद्या प्राधिकरण) कडून विविध कसोट्या तयार करण्यात आल्या होत्या. व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करणे, विद्यार्थी व पालकांना या क्षेत्रांची माहिती देऊन जागृती करणे हा कलचाचणीचा मुख्य हेतु आहे. ही परीक्षा आॅनलाईन संगणक प्रणालीद्वारे घेण्यात आली. आॅफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्याकरिता राज्य मंडळाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली होती. राज्यामध्ये १६ लाख १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी हे कल चाचणी दिली. नागपूर विभागात १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थी कलचाचणीला सामोरे गेले. यामध्ये जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. कलचाचणीचा निकाल शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने जाहीर केला. या निकालानुसार जिल्ह्यातील दहावीच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सरकारी सेवेला पहिली पसंती दिली. वाणिज्य शाखेला दुसरे प्राधान्य दिले. कला, मानवविद्या, आरोग्य, जैविक शिक्षण हे पर्यायदेखील विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात आले होते. पण, सरकारी नोकरीकडेच विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. कलचाचणीतील निष्कर्ष शिक्षक व पालकांनाही अंर्तमुख करणारे आहेत.
विद्यार्थिनींचा ओढा आरोग्य शिक्षणाकडे
जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थिनींनी आरोग्य व जैविक शिक्षणाला सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे निकाल सांगतो. याशिवाय मानवविद्या अभ्यासशाखाही विद्यार्थिनींना आवडत असल्याचे निकालातून दिसून आले.
शुक्रवारपासून मिळणार निकाल प्रत
शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या कलचाचणी निकालाची छापील प्रत विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाकडून २२ मार्च २०१९ पासून मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली. याची नोंद यामध्ये करण्यात आली आहे.
कला, संस्कृतीचीही आवड
शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायामध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी ललित कलांना पसंती दिली. कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्राविषयी आवड निर्माण होत असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.
उपाययोजनांचे काय?
शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीत आज प्रचंड बदल झाला आहे. विद्यार्थ्यांवर सोशल मीडियाद्वारे माहितीचा मारा होत आहे. यातून विधायक आणि विघातक कोणते, याची निवड करताना विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याचा धोका आहे. व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी शासकीय नोकरी हेच प्रमुख आकर्षण त्यांच्यापुढे आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी समुपदेशक व शिक्षकांची मोठी कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये समुपदेशक शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.