अध्यापनाची चाकाेरी ओलांडून घडवितात विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:30+5:302021-01-03T04:29:30+5:30
चंद्रपूर : ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षण व स्वातंत्र्य नाकारून परावलंबी ठेवण्याच्या काळात क्रांतिज्योती ...
चंद्रपूर : ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षण व स्वातंत्र्य नाकारून परावलंबी ठेवण्याच्या काळात क्रांतिज्योती सावित्री आणि महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचे दार उघडले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अध्यापनाची चाकाेरी ओलांडणाऱ्या शिक्षिका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवीत आहेत. यातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा परीघ विस्तारत आहे.
माया सहारे
नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या मुख्याध्यापिका माया सहारे या सतत सक्रिय असतात. त्या भिकेश्वर येथील जि. प. शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थी व पालकांना उपयोगी पडतील असे उपक्रम राबवितात. शिक्षकांना प्रोत्साहन देतात. विविध स्पर्धा, विस्मरणातील ओव्या, रोवणीगीत, दळणगीत व लोकगीतांच्या गायनाची परंपरा जाेपासतात. अभ्यासात मागे पडलेल्या मुलांसाठी झटतात.
विद्या सयाम
आदर्श ग्राम घाटकूळ येथील जि. प. उच्च प्राथमिक मॉडेल शाळेतील शिक्षिका विद्या सयाम या नृत्य, गायन, रांगोळी सांघिक खेळात नवीन प्रयोग करतात. सामाजिक व सहकारी क्षेत्रातही त्यांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तेसाठी धडपडतात. नवरत्न स्पर्धेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी जिल्हा स्पर्धेत सहभागी झाले.
स्वाती बेत्तावार
चंद्रपूर मनपाच्या रयतवारी कॉलरीतील मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्वाती बेत्तावार यांनी पाठ्यपुस्तकाच्या पलीकडील जग मुलांना कळावे, यातून त्यांच्या ज्ञानाचा पाया भक्कम करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवितात. क्षेत्रभेटी घडवून आणतात. कोरोना लॉकडाऊन काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत राबविलेले अनेक उपक्रम मुलांच्या जाणिवा समृद्ध करणारे ठरले.
मंजुषा डंभारे
मुलांनी मराठीसोबतच जागतिक ज्ञानभाषा इंग्रजी आत्मसात करून पाया पक्का करावा, यासाठी इंग्रजीचे ज्ञान संस्कार रुजविणाऱ्या मंजुषा डंभारे या बोर्डा बोरकर येथील जि. प. शाळेत कार्यरत आहेत. इंग्रजी भाषा अत्यंत सोप्या पद्धतीने शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. राज्य शासनाच्या तेजस प्रकल्पांअंतर्गत राबविण्यात येणारे सर्वच उपक्रम मुलांसाठी दिशादर्शक आहेत.