सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थी वेठीस
By admin | Published: December 29, 2014 11:38 PM2014-12-29T23:38:59+5:302014-12-29T23:38:59+5:30
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने शालेय स्तराव बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलने आयोजित केली जातात. या संमेलनाचे
पालकांत संताप : चिमुकली मुले थंडीत कुडकुडली
चंद्रपूर : विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने शालेय स्तराव बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलने आयोजित केली जातात. या संमेलनाचे आयोजन मर्यादेचे भान ठेवून व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र रविवारी सिनाळा येथील बिटस्तरीय संमेलनाच्या आयोजकाने तर सर्व नियमांची लक्तरे वेशीवर टांगली. रात्री १.३० वाजेपर्यंत मोकळ्या मैदानात बोचऱ्या थंडीत कुडकुडायला लावले. विशेष म्हणजे, सादरीकरणाप्रसंगी थंडीमुळे विद्यार्थ्यांना धड बोलताही येईना. या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण विभागाविषयीही रोष व्यक्त केला जात आहे.
डिसेंबर महिन्यात जिल्हाभर बिटस्तरीय शालेय क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. परिसरातील १० ते १२ शाळांना सहभागी करून विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी सकाळच्या सत्रात या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सायंकाळपासून संबंधित गावातच सांस्कृतिक कार्यक्रमे पार पडतात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या सांस्कृतिक कार्यक्रमामागील उद्देश. त्यामुळे अशा कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. मात्र इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होत असल्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना नियमांचे काटेकोर पालन व मर्यादेचे भान ठेवणे आवश्यक आहे. मात्र अलीकडे हे भानच शिक्षण विभागातील आयोजक विसरत चालले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अकारण पिळवणूक होत आहे.
चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा येथील बिटस्तरीय संमेलनात याचाच प्रत्यय आला. शिवणी येथे पद्मापूर बिटांतर्गत रविवार व सोमवारी बिटस्तरीय क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संबंधित बिटाचे केंद्र प्रमुख आणि गावकऱ्यांच्या सहभागातून हे कार्यक्रम सुरू आहे.
रविवारी सकाळी ८ वाजतापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. या बिटातील २३ शाळेतील सुमारे बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलावण्यात आलेले प्रमुख पाहुणे विलंबाने आल्याने सकाळच्या सत्रातील कार्यक्रम सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरूच होते.
त्यामुळे रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही सुरू होण्यास विलंब झाला. सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत संपणे अपेक्षित होते. मात्र रात्री ९.३० वाजता या कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली. त्यामुळे मध्यरात्री १ वाजेपर्यंत हा कार्यक्रमच सुरूच राहिला. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच विद्यार्थी सहभागी असल्याने लहान मुलेही यात होती. अनेक विद्यार्थ्यांनी स्वेटरही घातले नव्हते.
विशेष म्हणजे, रविवारी थंडीचा जोर चांगलाच होता. अशा परिस्थितीत मध्यरात्रीच्या थंडीत विद्यार्थी अक्षरश: थरथरत होते. इच्छा नसतानाही कुडकुडत त्यांना थंडीत रहावे लागले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम मोकळ्या मैदानात सुरू होता. वरून कोणतेही आच्छादन नव्हते. ज्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करायचे होते, त्यांना स्टेजवर थंडीमुळे धड बोलताही येत नव्हते. (शहर प्रतिनिधी)