भागाकारात चंद्रपूरचे विद्यार्थी राज्यात सरस; असर सर्वेक्षणात जिल्हा चौथ्या क्रमांकावर
By परिमल डोहणे | Published: January 23, 2023 03:59 PM2023-01-23T15:59:42+5:302023-01-23T16:01:58+5:30
डाएटच्या व जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे फलित
चंद्रपूर : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे देशपातळीवर घेतलेल्या असर सर्वेक्षणामध्ये जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी भागाकारात सरस दिसून आले. असर सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातील भागाकार करता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४२.३ असून, राज्यात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या क्रमांकावर सिंधुदुर्ग, द्वितीय कोल्हापूर, तृतीय रत्नागिरी यांचा समावेश आहे.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे दर दोन वर्षांनी असर सर्वेक्षण देशपातळीवर करण्यात येते. यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासल्या जाते. कोरोनामुळे २०१८ नंतर २०२२ला पिरामल ग्रुप आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्या हस्ते शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणाऱ्या असर अहवालाचे प्रकाशन, नवी दिल्ली येथे करण्यात आले. चार वर्षांच्या कालावधीनंतर देशभरात ६१६ ग्रामीण जिल्ह्यामध्ये असरचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनामुळे शाळा दीर्घकाळ बंद राहिल्या. त्यानंतर शाळा पुन्हा उघडल्या गेल्यानंतर असर सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन केलेल्या या सर्वेक्षणात इयत्ता तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मुलांचे मूलभूत वाचन आणि गणिताच्या क्षमतांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
यंदा राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी भागाकारात सरस दिसून आले. असर सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात चंद्रपूर जिल्ह्याची भागाकार करता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४२.३ टक्के असून, राज्यात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
उपक्रमाचा झाला फायदा
कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. परंतु, चंद्रपूर जिल्ह्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे विविध उपक्रम राबविले. यात मिशन गरुड झेप, मिशन ४५ दिवस, डीएलएससी कार्यक्रम, पालक संवाद, यशोमंथन, एलआयपी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांच्या नियोजित शाळा भेटी, प्रत्येक महिन्यास शिक्षण परिषदेचे आयोजन, केंद्रप्रमुखांच्या सक्षमीकरणासाठी पीएलसी, कार्यशाळा, त्याचप्रमाणे शिक्षकांना शैक्षणिक साहित्य वापरा संबंधाने प्रशिक्षण जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यांची शैक्षणिक प्रगती असर सर्वेक्षणात दिसून आली.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचे वर्गीकरण करून त्याची श्रेणीसुधार करण्यात येत आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ५० दिवसीय एक कार्यक्रम राबवून शिक्षणात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्यात आले. त्याचा फायदा या असर सर्वेक्षणात दिसून आला आहे. यापुढेही प्रगती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
- विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, चंद्रपूरद्वारा विविध उपक्रम कोविडकाळात राबविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गती कुठेही कमी झाली नाही. देश पातळीवर झालेल्या असर सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्याने भागाकारात महाराष्ट्रात चौथे स्थान पटकावले आहे.
- राजकुमार हिवारे, प्राचार्य जिल्हा, शिक्षण व प्रशिक्षण संस्था.
..अशी आहे क्रमवारी
*जिल्हा - टक्केवारी*
- सिंधुदुर्ग - ५२.६
- कोल्हापूर - ५०.४
- रत्नागिरी - ४७.४
- चंद्रपूर - ४२.३
- हिंगोली - ४१.१
- पुणे - ४०.४
- गोंदिया - ३७.६
- सांगली - ३७