विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रिक पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:10 PM2018-07-08T23:10:07+5:302018-07-08T23:11:05+5:30
कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लॉसेसमध्ये उपस्थित राहत असल्याने नियमित वर्गाची उपस्थिती कमालीची घटली आहे.
रत्नाकर चटप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लॉसेसमध्ये उपस्थित राहत असल्याने नियमित वर्गाची उपस्थिती कमालीची घटली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता शासनाने १५ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. याबाबतचे पत्र सर्वच विभागातील शिक्षण उपसंचालकाने जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
त्यामुळे एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आणि नियमित वर्ग कोचिंग क्लॉसेसमध्ये करणे या प्रक्रियेला चाप बसणार आहे. सदर बायोमेट्रिक पद्धती राज्यातील खासगी अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यता कनिष्ठ महाविद्यालयांना लागू आहे. यापूर्वी जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात प्रवेश एकीकडे आणि कोचिंग दुसरीकडे असा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. वर्गातील अनेक विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये जात असल्याने नियमित उपस्थिती रोडावली. यात नियमित उपस्थित राहणाºया विद्यार्थ्यांना वर्गात अनियमिततेचा फटका बसत आहे. तर काही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक खासगी कोचिंगकडे अधिक लक्ष देत असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांकडून शिक्षणाच्या नावावर लाखो रुपये जमा करुन स्वत:च कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा प्रकारही नवीन नाही. यामुळे मुख्यत: शहरात कनिष्ठ महाविद्यालयापेक्षा कोचिंग क्लॉसेसची गर्दी वाढत असल्याचे सध्या तरी चित्र निर्माण झाले आहे. यात गरीब होतकरु विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शिक्षकांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने सर्व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेला १५ जुलैपर्यंत बायोमेट्रिक मशिन बसविण्याचे आदेश दिले असून काही महाविद्यालयात सदर प्रक्रिया सुरुही करण्यात आली आहे.
सदर पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतली जाणार असून अंतिम परीक्षेसाठी किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक असल्याचे समजते. त्याचबरोबर बायोमेट्रीक मशिनमध्ये त्याच विद्यार्थ्याचचा अंगठ्याचा ठसा घेतला जाणार असल्याने उपस्थिती चांगली राहणार असल्याचा आशावाद कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व्यक्त करीत आहे.
अनेक पालकांनी भरले कोचिंग शुल्क
जिल्ह्यातील चालू सत्रात इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर अनेक पालकांनी खासगी कोचिंक क्लॉसेसमध्ये हजारो रुपये खर्च करुन प्रवेश घेतला आहे. दुसरीकडे या विद्यार्थ्यांचे प्रवेश शहरातीलच काही अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले आहे. प्रवेश करतेवेळी विद्यार्थी संख्येसाठी वर्गात नियमित उपस्थित न राहता कोचिंग क्लॉसेसमध्ये वर्गात उपस्थिती राहण्याचे सांगण्यात आले आहे. आत बायोमेट्रिक पद्धतीमुळे पाल्यांना कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
अशीही शक्कल लढविण्याची शक्यता
बायोमेट्रिक पद्धतीमध्ये दोनप्रकारे उपस्थिती नोंदविता येते. एका प्रकारात अंगठ्याचा ठसा स्कॅन केला जातो तर दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या नावे एटीएमसारखे कार्ड वापरुनही उपस्थिती नोंदविता येते. काही कनिष्ठ महाविद्यालयात कोचिंग क्लॉसेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश देण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्यासाठी अंगठ्याच्या ठश्याऐवजी कार्डद्वारे दुसºया व्यक्तीकडून उपस्थिती नोंदविण्याची शक्यता असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये जोर धरत आहे. याकडे शिक्षणविभाग किती गंभीरतेने लक्ष देईल, हे पाहणे गरजेचे आहे.