विद्यार्थी म्हणतात... बस्स झाले, आता लालपरी हवीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:03+5:302021-09-18T04:30:03+5:30
विकास खोब्रागडे पळसगाव (पिपर्डा) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, ...
विकास खोब्रागडे
पळसगाव (पिपर्डा) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा सुरू नसल्याने शाळेपर्यंत जायचे कसे, या चिंतेत विद्यार्थी आणि पालक सापडले आहेत.
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला. तरी बरेच विद्यार्थी अजून घरीच आहेत. त्यामुळे एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावागावांत शाळा आहेत. पण माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून सुमारे २२ ते २५ किलोमीटर दूर शहरातील किंवा परिसरातील मोठ्या गावात जावे लागते. यासाठी विद्यार्थी सुरक्षित आणि सवलतीची म्हणून शासनाच्या एसटी सेवेचा लाभ घेतात. तसेच पाचवी ते बारावीपर्यंत शासनाने सावित्रीबाई फुले मोफत पास योजना मुलींसाठी लागू केली आहे. मुलांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जातो.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच गावात, शहरात शाळा सुरू केल्या आहेत. पण पळसगाव पिपर्डा, गोंडमोहाळी,पारणा व बऱ्याच ठिकाणी एसटी बस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे. गावापासून लांब असणाऱ्या शाळेत जायचे कसे, हा प्रश्न भेडसावत आहे. एसटी बस सुरू नसल्याने काही पालक आपल्या पाल्याला सोडण्यासाठी जात आहेत, तर काही ठिकाणी खासगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुले शाळेत जात आहेत.
त्यामुळे चिमूर तालुक्यातील पळसगाव सिंदेवाहीमार्गे एसटी सेवा सुरू करा, अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया जेव्हा पळसगाव येथे रक्षबांधन कार्यक्रमाला आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी केली होती. त्यावेळी आठ दिवसांत बस चालू होणार, असे आश्वासन आमदारांनी दिले होते. मात्र अजूनही बस सुरू न झाल्याने आमदारांचे आश्वासनही हवेत विरल्यागत दिसत आहे.
बॉक्स
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा
एसटी बस सुरू होण्यास पळसगाव पिपर्डा येथील पुलाचा अडथळा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावरच ही समस्या उद्भवते. असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान का, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
170921\screenshot_2021-09-17-09-39-14-96.jpg
ग्रामीण भागातील विद्यार्थी लाल परीच्या प्रतीक्षेत