नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राकरिता विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये
By admin | Published: July 16, 2016 01:16 AM2016-07-16T01:16:42+5:302016-07-16T01:16:42+5:30
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज चंद्रपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल केलेले आहे.
प्रकाश देवतळे : निवेदन सादर
चंद्रपूर : नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज चंद्रपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल केलेले आहे. सध्या सर्व कॉलेज, महाविद्यालय सुरू झालेले असताना प्रशासनाकडून नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राकरिता विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला आहे.
यासंबंधी कोणत्याही प्रकारची अट नसताना संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ गावातील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र घ्या, अशा प्रकारची अट घालून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.
यासंबंधी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या १० जून २०१४ च्या पत्रान्वये नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राकरिता मूळ गावाची अट नसल्याचे पत्र जारी करण्यात आले असतानाही प्रमाणपत्र दिले जात नाही.
या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दखल घ्यावी. या संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे, असेही देवतळे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)