वर्ग खोलीअभावी विद्यार्थी बसतात झाडाखाली
By admin | Published: December 9, 2015 01:35 AM2015-12-09T01:35:14+5:302015-12-09T01:39:18+5:30
पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडेखल येथे सन २०१४-१५ पासून वाढीव वर्ग सुरू झाले.
कोंडेखल जिल्हा परिषद शाळा : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
उपरी : पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडेखल येथे सन २०१४-१५ पासून वाढीव वर्ग सुरू झाले. मात्र दोन वर्षापासून येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतने शिक्षण विभागाकडे वाढीव वर्ग खोलीची मागणी करूनही संबंधित विभागाने येथे इमारत बांधून दिली नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या संदर्भात येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत तथा गावातील प्रतिष्ठिातांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. कोंडेखल हे एक हजार लोकसंख्येचे गाव असून येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते पाचपर्यंत वर्ग आहेत. इमारती मात्र दोनच असल्याने पाच वर्ग घ्यावे कसे, बसावे कुठे, असा प्रश्न मागील दोन वर्षापासून शिक्षकांना पडला आहे. सद्या जिल्हा परिषद शाळेत असलेल्या दोन इमारतीमध्ये एक इमारतीतील वऱ्हांड्यात कायारलय व खोलीमध्ये दोन वर्ग बसतात. तर दुसऱ्या इमारतीतील वऱ्हांड्यात शाळेचे काही तुटलेले लोखंडी, लाकडी भंगार सामान व खोलीत दोन वर्ग बसतात.
सन २०१३-१४ पर्यंत या शाळेत पहिली ते चवथीपर्यंत वर्ग असल्याने व्यवस्था होत होती. परंतु सन २०१४-१५ मध्ये पाचवा वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षापासून येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतने शिक्षण विभागाकडे, सर्व शिक्षण अभियान अंतर्गत वर्ग खोलीची मागणी केली. मात्र येथे अजूनही संबंधित विभागाकडून वर्ग खोली देण्यात आलेली नाही. त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेचा एक वर्ग शाळा परिसरातील एका झाडाखाली घ्यावा लागत आहे. झाडाखाली वर्ग बसत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या झाडाखाली वर्ग बसतो त्या झाडावर कावळे, बगळे व इतर पक्षी बसून विस्टा करतात.
शाळेला पूर्णत: संरक्षण भिंत नाही. त्यामुये अनेकदा वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांचा लक्ष वळत असते. तेव्हा शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून कोंडेखल शाळेसाठी इमारत बांधून द्यावी अशी, मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर मंडोगडे व पदाधिकारी तसेच सरपंच ईश्वर ठुणेकार, उपसरपंच करिष्मा उंदिरवाडे, किशोर उंदिरवाडे, मोरेश्वर गोहणे, काशिनाथ महारे, पद्माकर पेंदोर, विनायक ठुणेकार व गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. (वार्ताहर)